मनसुख हिरेन यांची खरंच हत्या? एटीएसने केला गुन्हा दाखल… गूढ काही संपेना!

एटीएसने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे हत्या, पुरावे नष्ट करणे असे गुन्हे दाखल केले आहेत.

अंबानींच्या घराबाहेर ज्यांची गाडी आढळली होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्याने, त्यांच्या कुटुंबियांकडून ही आत्महत्या नसून हत्या असण्याचा आरोप करण्यात आला आहे. गृहविभागाकडून या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, ठाणे शहर पोलिसांकडून मनसुख हिरेन यांच्या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे वर्ग केला आहे. एटीएसने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे हत्या, पुरावे नष्ट करणे असे गुन्हे दाखल केले आहेत.

हत्येचा गुन्हा दाखल

आता या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलिस स्टेशनकडून हस्तगत करुन पुढील तपास सुरू केला. या तपासानुसार, आज ७ मार्च २०२१ रोजी भारतीय दंड विधेयकच्या कलम ३०२,२०१,३४,१२०(ब) प्रमाणे हत्या, पुरावा नष्ट करणे, एकत्रित कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुठलेही ठोस पुरावे नसल्यामुळे, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे व मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांच्या फिर्यादीवरुन दहशतवाद विरोधी पथक पोलिस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचाः मनसुख हिरेन यांची फसवून हत्या! नातलगांचा आरोप )

शवविच्छेदनाचा अहवाल वाचल्यावर झाले अंत्यसंस्कार!

मनसुख हिरेन हे गुरुवारी रात्री घरातून बाहेर पडल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडी येथे आढळून आला होता. मनसुख यांच्या तोंडात हात रुमाल कोंबण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. शनिवारी मुंब्रा पोलिसांच्या हाती पडलेल्या प्राथमिक अहवालात मनसुख यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या मारल्याच्या खुणा आढळून आलेल्या नसून, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होत नसल्याने अंतिम अहवाल राखून ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मुंब्रा पोलिसांनी शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल मनसुख यांच्या कुटुंबियांना वाचून दाखवून त्यांना मृतदेह ताब्यात घेण्याचा आग्रह करण्यात आला. दरम्यान मनसुख यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास होकार देत सायंकाळी उशिरा मनसुख यांचा मृतदेह ताब्यात घेऊन, ठाण्यातील जवाहर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाण्यात बुडवून ठार मारल्याचा भावाचा आरोप!

मनसुख पट्टीचा पोहणारा होता, त्यांचा बुडून मृत्यू होऊच शकत नाही. त्यांची हत्या करून मृतदेह पाण्यात फेकला असल्याचा संशय मनसुख यांचे मोठे भाऊ विनोद यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी योग्य तपास करून आम्हाला न्याय द्यावा, असे विनोद यांनी म्हटले होते. मनसुख त्यांच्या विकास पाम या इमारतीजवळ हजारोच्या संख्येने नातलग, मित्रमंडळी आणि व्यापारी जमा झाले होते, प्रत्येकाच्या तोंडी मनसुख आत्महत्या करुच शकत नाही. त्याची हत्या करण्यात आली हेच होते. मनसुखला फसवून घराबाहेर बोलावले आणि त्याची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप मनसुख यांच्या जवळच्या मित्रांनी केला होता.

(हेही वाचाः मनसुख हिरेनच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन वसई! गूढ वाढले!!)

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here