मनसुख हिरेन प्रकरणाचा क्राईम सीन रिक्रिएट करणार!

मनसुख बेपत्ता झाल्यापासून मृतदेह सापडण्यापर्यंतचा क्राईम सीन एटीएसकडून उभा करण्यात येणार असल्याची माहिती, एटीएसच्या सूत्रांकडून मिळत आहे.

मनसुख हिरेनच्या मृत्युचे नक्की कारण अद्याप अस्पष्ट असताना, दहशतवाद विरोधी पथकाने रविवारी मनसुखच्या मृत्यू प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध हत्या, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, तसेच कट रचणे या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. मनसुख यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसुख बेपत्ता झाल्यापासून मृतदेह सापडण्यापर्यंतचा क्राईम सीन एटीएसकडून उभा करण्यात येणार असल्याची माहिती, एटीएसच्या सूत्रांकडून मिळत आहे.

अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

या संदर्भात एटीएसचे पोलिस महानिरीक्षक शिवदीप लांडे यांनी घटनास्थळाला रविवारी दुपारी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. रविवारी दुपारी एटीएसचे दुसरे पथक पोलिस महानिरीक्षक राजकुमार शिंदे यांनी मुंब्रा पोलिसांकडून या प्रकरणाची सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन हिरेन कुटुंबियांची त्यांच्या ठाण्यातील राहत्या घरी भेट घेतली. या भेटीदरम्यान एटीएसने मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा जबाब नोंदवून, अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड विधेयक कलम ३०२(हत्या), २०१( पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न), १२०ब (कट रचणे) ३४(सह) अन्वये गुन्हा दाखल करुन हत्येच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.

(हेही वाचाः मनसुख हिरेन यांची खरचं हत्या? एटीएसने केला गुन्हा दाखल… गूढ काही संपेना!)

क्राईम सीन रिक्रिएट करणार

मनसुख हिरेन गुरुवारी घरातून बाहेर निघाल्यापासून ते कुणाच्या संपर्कात होते, कुठे गेले त्यांचा फोन किती वाजता बंद झाला तेव्हापासून मुंब्रा रेतीबंदर खाडी या ठिकाणी मनसुख यांचा मृतदेह सापडला इथपर्यंत क्राईम सीन रिक्रिएट(घटनेचा अथवा गुन्ह्याचा देखावा उभा करणे) करण्यात येणार आहे. यासाठी एटीएसचे पोलिस महानिरीक्षक शिवदीप लांडे यांनी रविवारी मुंब्रा रेतीबंदर ज्या ठिकाणी मनसुख यांचा मृतदेह सापडला, त्याठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे.

मनसुख यांच्या अंगावरील दागिने आणि पाकीट कुठे गेले?

मनसुख हिरेन हे गुरुवारी रात्री तावडे नावाच्या अधिकाऱ्याला भेटून येतो असे सांगून, घरातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्या गळ्यात सोन्याची चेन, बोटात अंगठ्या होत्या, तसेच मोबाईल आणि पैशांचे पाकीट खिशात होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. मात्र मनसुख यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी मुंब्रा रेतीबंदर या ठिकाणी चिखलात रुतलेल्या अवस्थेत मुंब्रा पोलिसांना सापडला त्यावेळी मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे दागिने अथवा पैशांचे पाकीट पोलिसांना आढळून आले नाही. तसेच त्यांचा मोबाईल फोन देखील घटनास्थळी नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जर मनसुख यांच्या मृतदेहावर दागिने, पैशांचे पाकीट मोबाईल फोन सापडला नाही तर हे सगळे गेले कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here