आदिपुरुष या नावाचा एक चित्रपट ओम राऊत नावाच्या एका दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट विश्वातले पहिले महाकवी महर्षी वाल्मिकी यांच्या रामायणावर आधारित आहे. रामायण आणि महाभारत हे हिंदू संस्कृतीचे आधारभूत ग्रंथ आहेत. त्याचबरोबर हे दोन्ही ग्रंथ जगातले सर्वात श्रेष्ठ ग्रंथ म्हणून जगमान्य झालेले ग्रंथ आहेत. अशा ग्रंथावर आधारित चित्रपट काढताना त्या ग्रंथाचा आधार घेऊनच चित्रपट काढणे हे त्या चित्रपटाशी संबंधित असलेल्या चित्रपट निर्माता, दिग्दर्शक यांच्यासह सर्व कलाकारांचे कर्तव्य आहे. तथापि हिंदूंच्या सांस्कृतिक धार्मिक भावनांची कदर न करता अनेक वेळा चित्रपटात हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्यात आले आहेत. आदिपुरुष हा चित्रपट सुद्धा त्याला अपवाद नाही.
हिंदू धर्म, हिंदू संस्कृती सात्विकतेची शिक्षण देणारी आहे. माणसामधली राक्षसी वृत्ती दूर व्हावी आणि मानवी समाज मनावर सुसंस्कारांचे सिंचन करण्याचे काम हिंदू संस्कृती, हिंदू धर्म करतो. विकृती आणि विकारांना थारा द्यायचा नाही अशी शिकवण देणारी ही संस्कृती आहे. श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, पवनपुत्र हनुमान या साऱ्या विभूती आजही सर्व हिंदूंना आदरणीय, वंदनीय, प्रातःस्मरणीय आहेत. असे असतानाही आदिपुरुष या चित्रपटात श्रीराम, हनुमान, रावण यांना देण्यात आलेली वेशभूषा हिंदू संस्कृतीला शोभणारी नाही. या चित्रपटातल्या या व्यक्तिरेखांना मुसलमानांचा पेहराव आहे. त्यांच्यप्रमाणे मुघलांप्रमाणे केशरचना आणि दाढी दाखवण्यात आली आहे. हा श्रीराम, श्रीहनुमान आणि रावण या रामायणातील व्यक्तिरेखांचा केलेला अवमान आहे. हे हिंदू संस्कृतीचे केलेले विडंबन आहे.
या चित्रपटात दाखवलेला रावण मूळ रामायणातल्या रावणापेक्षा भिन्न आहे. आदिपुरुष चित्रपटातला रावण हा खिलजी सारखा दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर या चित्रपटात पुष्पक विमानाऐवजी वटवाघुळ दाखवले आहे. हे सर्वात मोठे विडंबन चित्रपट निर्माते दिग्दर्शक यांनी केले आहे. असा चित्रपट निर्माण करून आणि दिग्दर्शित करून यांनी आपल्या विकृत मनोवृत्तीचे प्रदर्शन केले असे म्हटल्यास कोणाला राग येऊ नये.
या चित्रपटातील हनुमानाला शेपूट नाही. पण दाढी असलेला हनुमान दाखवण्यात आला आहे. हिंदूंच्या देवदेवतांचा अनादर करण्याचे धाडस चित्रपट निर्मात्यांना, दिग्दर्शकांना नेहमीच होते. अन्य धर्मीयांच्या संस्कृती विषयी आणि त्यांच्या श्रद्धास्थानांवर अशा प्रकारचे विडंबन करण्याचे धाडस मात्र या चित्रपट दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी कधीही केलेले आढळत नाही. त्यांनी असे धाडस केले तर काय होईल हे सांगण्याची आवश्यकता नाही. हिंदू सहिष्णू आहेत. त्यांनी त्यांच्या धर्माची, संस्कृतीची, श्रद्धास्थानांची कोणीही खिल्ली उडवली, टिंगल टवाळी केली तरीसुद्धा त्यांनी ती सहन केली पाहिजे. असा अलिखित नियमच या लोकांनी केला आहे. आम्हाला चित्रपटांमध्ये आमच्या भावना व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
त्यामुळे आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणीही गदा आणू नये. हिंदूंनी जरासा जरी विरोध केला की घटना आणि लोकशाही लगेच धोक्यात येते. सामाजिक वातावरण बिघडते. अशी आवई उठते.अशा पाखंड आणि लबाड माणसांना आता असे सांगण्याची आवश्यकता आहे की घटनेने हिंदूंच्या भावना ठेचून टाका. हिंदूंच्या धर्माची, संस्कृतीची टिंगल टवाळी करा, हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अपमान करा, हिंदूंना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेले नाही, त्यामुळे हिंदूंनी शांतपणाने त्यांच्यावरचा अन्याय सहन केलाच पाहिजे. असा उल्लेख घटनेत कुठेही केलेला नाही. किंवा कशा प्रकारचा कोणताही निर्बंध (कायदा) अस्तित्वात नाही. असे असतानाही अशा गोष्टी वारंवार घडतात आणि असे करणाऱ्यांना कोणताही पाय बंद घातला जात नाही. हीच लाजिरवाणी गोष्ट आहे.
वास्तविक चित्रपट प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र देण्यात येते. तसे प्रमाणपत्र देण्यासाठी सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात आहे. सेंसर बोर्डाचे पदाधिकारी याबाबत कोणत्याही प्रकारची हरकत घेत नाहीत. देशात प्रदर्शित केल्या जाणाऱ्या कोणत्याही चित्रपटातून कोणत्याही धर्माच्या, संस्कृतीच्या आणि कोणत्याही समाजाच्या श्रद्धास्थानांना धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेऊनच चित्रपट प्रदर्शित करण्याची अनुमती सेंसर बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली पाहिजे. ही काळजी जर ते घेणार नसतील तर अशा प्रकारचे एखाद्या धर्माच्या, संस्कृतीच्या अनुयायांच्या भावनांवर आणि श्रद्धा स्थानांवर आघात करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करणारे निर्माता, दिग्दर्शक जेवढे दोषी आहेत तेवढेच सेन्सॉर बोर्डाचे पदाधिकारीही दोषी आहेत. त्यामुळे केवळ चित्रपटावर बहिष्कार टाकून उपयोग नाही तर सेन्सॉर बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना तत्काळ त्या पदावरून दूर करणे नितांत आवश्यक आहे. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे. तरच असला आचरटपणा थांबेल. अन्यथा वारंवार अशा चित्रपटांची निर्मिती होत राहील आणि आपल्याला बहिष्कार टाकण्याचेच काम करावे लागेल. म्हणून यावर कायमचा उपाय हाच की सेंसर बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनाही दोषी ठरवले जावे. त्याचबरोबर धार्मिक भावना दुखावल्या म्हणून संबंधित चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात चित्रपट, नाट्य अशा कोणत्याही क्षेत्रात काम करण्यास कायमची बंदी घातली जावी. अशी मागणी हिंदूंनी करणे इष्ट ठरेल.
Join Our WhatsApp Community