संगीत वाद्यांच्या प्रतिकृतींनी पालटले अंधेरीतील मोहिले उद्यानाचे रुपडे!

166

अंधेरी (पश्चिम) परिसरात असणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘संगीतकार अनिल मोहिले मनोरंजन उद्यान’ येथे विविध संगीत वाद्यांच्या भव्यदिव्य आकारातील आकर्षक व प्रत्ययकारी प्रतिकृती आहेत. या प्रतिकृतींची डागाडुजी, रंगरंगोटी करण्यासह परिरक्षणाची कामेदेखील नुकतीच पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे या उद्यानाला एक नवी झळाळी व आकर्षक रुपडे बहाल झाले आहे.

Maidan 1

या उद्यानास झाली नवी झळाळी प्राप्त

या उद्यानामध्ये विविध वाद्यांच्या प्रतिकृतींसह मुलांसाठी खेळणी, खुली व्यायमशाळा, योगकेंद्र इत्यादी सुविधा आहेत. तर उद्यानातील पदपथांच्या कडेलाच असणा-या ध्वनिक्षेपकांमधून संगीत ऐकविण्याची व्यवस्थाही निर्धारित वेळी या उद्यानात करण्यात येते. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, ‘के पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहाण यांच्या नेतृत्वात व उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या पुढाकाराने या उद्यानामध्ये विविधस्तरिय कामे करण्यात आली आहेत. ज्यामुळे या उद्यानास नुकतीच नवीन झळाळी प्राप्त झाल्यानंतर आता केवळ परिसरातील नागरिकच नव्हेत, तर परदेशी पर्यटक देखील या उद्यानास भेट देत आहेत. संगीत उद्यान म्हणून विकसित करण्यात आलेल्या या उद्यानाचे लोकर्पण हे दिनांक २३ डिसेंबर, २०१६ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

Maidan 2

(हेही वाचा – आघाडी सरकार आल्यापासून पेपर फुटीचे पेव, मनसेचा घाणाघात)

अंधेरी (पश्चिम) येथील चार बंगला नजीक व मॉडेल टाऊन परिसरात असणा-या ‘संगीतकार अनिल मोहिले मनोरंजन उद्यान’ याची महत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेतः-

• हे उद्यान तब्बल १ लाख १ हजारांपेक्षा अधिक चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिसरात बहरलेले उद्यान आहे.

• या उद्यानात तबला, संवादिनी (हार्मोनियम), वीणा, सितार, गिटार इत्यादी विविध वाद्यांच्या प्रत्ययकारी प्रतिकृती आहेत. या प्रतिकृतींसोबत सेल्फी, छायाचित्रे काढण्यासाठी नागरिकांची व विशेष करुन लहान मुलांची लगबग नेहमीच दिसून येते.

• या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर व प्रवेशद्वारा नजीकच्या भिंतीवर देखील विविध वाद्यांच्या प्रतिकृती चितारलेल्या आहेत. यानुसार उद्यानातील भिंतींवर की-बोर्ड, मृदुंग, तबला-डग्गा व संगीत चिन्हांचा वापर करुन आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे.

• या उद्यानात पुष्पवाटिका, पुष्पकुंज यासह फुले असणा-या वेलींनी सुशोभित केलेला ‘पुष्पलता मंडप’ देखील आहे. त्याचबरोबर विविध प्रजातींची झाडे, फुलझाडे आणि आकर्षक हिरवळ देखील या उद्यानामध्ये ठिकठिकाणी आहे.

• या उद्यानातील पदपथांच्या लगत ध्वनिक्षेपक बसविण्यात आले असून, याद्वारे दररोज ठरलेल्या वेळी मंद आवाजातील संगीताचे सूर पाझरत असतात.

• या उद्यानात खुली व्यायामशाळा, योगाकेंद्र, व्हॉलीबॉल मैदान, आसन व्यवस्था इत्यादी सोई-सुविधा आहेत. तसेच ३ ‘गझिबो’ देखील या उद्यानामध्ये आहेत.

• हे उद्यान दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९ पर्यंत नागरिकांसाठी खुले असते.

‘संगीत’ या संकल्पनेवर आधारित ‘थीम’ उद्यान

‘संगीत’ या संकल्पनेवर आधारित हे ‘थीम’ उद्यान सुप्रसिद्ध संगीतकार अनिल मोहिले यांच्या स्मृतींना समर्पित आहे.  अनिल मोहिले यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपट गीतांना संगीतबद्ध केले असून अनेक चित्रपटांसाठी ‘संगीत संयोजन’ देखील केले आहे. भारतरत्न श्रीमती लतादीदी मंगेशकर यांच्यासह संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांच्या विविध संगीत कार्यक्रमांचे संगीत संयोजन देखील त्यांनी केले होते. विशेष म्हणजे संगीतकार अनिल मोहिले हे याच उद्यानाच्या परिसरात दरवर्षी ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन करीत असत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.