मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव! ‘या’ ऑलिम्पिकवीरांच्या साहित्यांचा लिलावात समावेश

या लिलावात ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक मध्ये सहभागी झालेल्या आणि पदक प्राप्त खेळाडूंचे साहित्य यंदा या लिलावाचे खास वैशिष्ट्य असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबरला आपला 71वा वाढदिवस साजरा केला. यावेळी देश-विदेशातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्यांना वाढदिवशी दरवर्षी त्यांच्या चाहत्यांकडून हजारो वस्तू भेट स्वरुपात दिल्या जातात. या वस्तूंचा संस्कृती मंत्रालयाकडून लिलाव केला जातो. त्याप्रमाणे या वर्षीसुद्धा त्यांना भेट मिळालेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. 7 ऑक्टोबर पर्यंत पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तू तसेच स्मृतीचिन्ह यांचा लिलाव करण्यात येणार आहे. म्हणजे या लिलावात ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक मध्ये सहभागी झालेल्या आणि पदक प्राप्त खेळाडूंचे साहित्य यंदा या लिलावाचे खास वैशिष्ट्य असणार आहे.

या वस्तूंचा होणार लिलाव

पंतप्रधान मोदींना त्यांच्या वाढदिवशी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडूंनी आपल्या खेळांचे साहित्य भेट म्हणून दिले आहे. या वस्तूंचा समावेश देखील लिलावात करण्यात येणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत लक्षणीय कामगिरी करणा-या भवानी देवीची तलवार, पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा कृष्णा नागर आणि रौप्य पदक विजेता सुहास एलवाई यांच्या रॅकेटची 10 करोड रुपये बोली लावण्यात आली आहे. तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळ प्रकारात पहिल्यांदाच भारताला सुवर्ण पदक मिळवून देणा-या निरज चोप्राच्या भाल्याची बोलीसुद्धा करोडोमध्ये लावण्यात आली आहे. बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक मिळवणा-या पी.व्ही सिंधूचे बॅडमिंटन रॅकेट आणि बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक विजेत्या लवलिना बोर्गोहेनच्या ग्लोजचाही यात समावेश आहे. तब्बल 2700 वस्तूंचा या लिलावात समावेश आहे. या लिलावातून जमा होणारी रक्कम ‘नमामि गंगे’ या योजनेसाठी समर्पित केली जाणार आहे. या वस्तूंचा ई-लिलाव करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः विराटने दिला चाहत्यांना अजून एक धक्का… ‘हे’ कर्णधारपदही सोडणार)

पंतप्रधान मोदींचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्वीट करत लोकांना भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांच्या लिलावात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “गेली अनेक वर्षे मला अनेक भेटवस्तू आणि स्मृतिचिन्ह मिळाली आहेत, ज्यांचा लिलाव होत आहे. त्यात आमच्या ऑलिम्पिक खेळाडूंनी दिलेल्या विशेष स्मृतीचिन्हांचाही समावेश आहे. त्यामुळे या लिलावात सर्वांनी सहभागी व्हा. या लिलावातून मिळणारी रक्कम ‘नमामि गंगे’ उपक्रमासाठी वापरली जाईल, असे नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत स्पष्ट केले आहे. नमामि गंगे मिशनचा उद्देश गंगा नदीचे संवर्धन आणि कायाकल्प करणे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here