‘माझी जन्मठेप’चा रंगमंचीय आविष्कार अनुभवताना राष्ट्रप्रेमी झाले भावुक

164

‘माझी जन्मठेप’ हा ग्रंथ म्हणजे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे वीर रसाने ओथंबलेले चरित्र. सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त शनिवारी ‘नाट्यसंपदा’तर्फे या ग्रंथाचा रंगमंचीय आविष्कार सादर करण्यात आला. त्यागमूर्ती वीर सावरकरांचा कष्टमय जीवनप्रवास रंगमंचावर अनुभवताना रसिक भावुक झाले, कित्येकांना हुंदका दाटून आला.

वीर सावरकर यांना दोन जन्मठेपेची, म्हणजे पन्नास वर्षांची शिक्षा झाल्यावर त्यांची रवानगी अंदमानला केली गेली. तेथील त्यांचे जीवन म्हणजे मृत्यूशी झुंज होती; पण त्या झुंजीत मृत्यूचा पराभव झाला आणि सावकरांचा जय. ‘माझी जन्मठेप’ हे वीर सावरकर यांनी अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना आलेल्या अनुभवांवर लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तक आहे. सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त ‘नाट्यसंपदा कलामंच’च्या वतीने शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी या पुस्तकावर आधारित नाट्याविष्कार सादर करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृहात झालेल्या या अभिवाचनाच्या रंगमंचीय अविष्काराला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

या अभिवाचन कार्यक्रमाची संकल्पना अनंत वसंत पणशीकर यांची असून, दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर यांचे आहे. संकलन अलका गोडबोले, शब्दोच्चारासंबंधातील मार्गदर्शन सुहास सावरकर, संगीत मयुरेश माडगावकर यांचे, तर प्रकाश योजना शाम चव्हाण यांची आहे. या अभिवाचनामध्ये अभिजीत धोत्रे, अमृता कुलकर्णी, नवसाजी कुडव, जान्हवी दरेकर, शंतनू अंबाडेकर, मुग्धा गाडगीळ- बोपर्डीकर हे कलाकार सहभागी झाले.

झोपेचे तेवढे सुख…

”ज्या तेलाच्या घाण्याला बैलाकडूनसुद्धा इतके तेल काढून घेतले जात नव्हते, तिथे अंदमानातील कैदी कोलू फिरवून ३० पौंड तेल काढत. त्यात काहीही सवलत नव्हती. ही भयानक शिक्षा भोगताना शरीराला असह्य अशा वेदना होत. दिवसभर कोलू ओढून अंग पिळवटून येई, पोटाचे आतडे ताठले जात, भोवळ येई, रात्री कोठडीत अंग टाकले की गाढ झोप लागे. झोपेचे तेवढे सुख मला अंदमानात मिळाले”, या प्रसंगावेळी अनेकांना दाटून आले.

असा निवडला चमू

  • माझी जन्मठेप या ५०० पानाच्या ग्रंथाचे दोन-सव्वा दोन तासांत बसणारे संकलन करण्याचे शिवधनुष्य उत्तमरित्या पेलले ते अलका गोडबोले यांनी. या प्रयोगासाठी, उत्तम आवाज, मराठी भाषेवरचे प्रभुत्व, अभिनयाची आवड आणि विषयाचे गांभीर्य असणारे कलाकार शोधणे गरजेचे होते.
  • मग व्हॉटस्अप, फेसबूक, ट्विटर या सोशल मीडियाचा वापर करून ऑडिशन मागवण्यात आल्या. ६३ ऑडिशनमधून ६ तरुण मुलामुलींची टीम उभी राहिली. गेला दीड महिनाभर वाचनाच्या तालमी सुरू झाल्या.
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्द उच्चारायला खूप कठीण. ती जबाबदारी उचलली जेष्ठ रंगकर्मी सुहास सावरकर यांनी. ४० एक वर्षांचा अनुभव असलेले जेष्ठ दिग्दर्शक अनिल बांदिवडेकर यांनी या मुलांवर नाट्य संस्कार आणि दिग्दर्शन केले. अशा तर्‍हेने हा वाचनाचा अनोखा रंगमंचीय आविष्कार तयार झाला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.