‘आदिपुरुष’वर बहिष्कार टाका!

102

रामायण, महाभारत ही महाकाव्ये इतकी मोठी आहेत की त्यांची कुणी टिंगल करावी म्हटले तरी होणार नाही. आज जर हजारो वर्षांपासून ते संस्काररूपात आपल्यापर्यंत पोहचत असतील आणि जेव्हा त्यांचे आदिपुरुष सारख्या चित्रपटांमधून विडंबन होत असेल, तर त्यातून त्या महाकाव्याला धक्का पोहचत नाही, पण आपल्या धार्मिक भावना दुखावतात. अशावेळी प्रेक्षकांनी त्या चित्रपटावर बहिष्कार टाकावा, युट्युबवर ते वारंवार बघू नका, सोशल मीडियावर लाईक वाढवू नका, त्याकडे दुर्लक्ष करा. ज्याप्रकारे डाव्या विचारसरणीचे लोक आतापर्यंत उजव्या विचारांचे साहित्यिक, कलावंत यांना अनुल्लेखाने मारतात, तेच धोरण आपणही अवलंबवावे. जसे कलावंताचे अविष्कार स्वातंत्र्य तुम्ही मान्य करता, तसेच प्रेक्षकांचेही ‘बॉयकॉट’ अर्थात बहिष्कार हे अविष्कार स्वातंत्र्य आहे, ते मानायला हरकत नाही. आम्ही आमच्याच खिशातले पैसे खर्च करून तुम्ही श्रीराम, हनुमान यांच्या प्रतिमेची कशी तोडमोड केली आहे. ते बघायला येण्यापेक्षा आम्ही चौपाटीवर सहकुटुंब जाऊन भेळपुरी खाऊ.

प्रेक्षकांची नकारात्मक प्रतिक्रिया येत असेल, तर योग्यच

पुराणातील श्रीराम, श्रीकृष्ण अशी व्यक्तिरेखा असो अथवा छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे नायक असो किंवा खलपुरुषी पात्र असोत जी रामायण, महाभारतातील आहेत, त्यांची प्रतिमा आपल्या डोक्यात लहानपणापासून तयार झालेली असतात, त्यानुसार आपल्या श्रद्धा निर्माण झालेल्या असतात. अशा श्रद्धेला ठेच पोहचेल, असे विपरीत काही दिसले, तर साहजिकच त्याविषयी राग येतो, वाईट वाटते, भावना दुखावल्या जातात, हे होणे अगदी स्वाभाविक आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटात श्रीरामाची भूमिका केलेला अभिनेता प्रभास याच्या अभिनयाबद्दल बोलणे हे फार पुढचे होईल. परंतु आता जेव्हा त्या चित्रपटाचे पहिले पोस्टर पाहायला मिळत आहे, त्याचा टिझर बघायला मिळत आहे. तेव्हा आपल्या कल्पनेच्या अगदी विपरीत श्रद्धास्थानांची प्रतिमा दिसते, तेव्हा आपल्या भावना दुखावतात. त्यामुळे जर यावरून जनक्षोभ उसळत असेल किंवा प्रेक्षकांची नकारात्मक प्रतिक्रिया येत असेल, तर ती योग्यच आहे. आजवर ‘रणकर्कश राम राम…’ म्हणत श्री रामाला योद्धा म्हणून दाखवताना त्यांचे चित्रण जसे केलेले आहे, ते आपल्याला पटलेले आहे. तशी प्रतिमा घेऊन आपण जीवनात आपल्या धार्मिक भावना जपत असतो. आदिपुरुष चित्रपटात रावणाचे वर्णन अगदी खिलजीप्रमाणे केल्याचा जो आरोप प्रेक्षकांकडून होत आहे, त्यातही तथ्यच आहे. रामायणात रावणाचा श्री रामाने सन्मान केला आहेच. कारण तो प्रकांड शिवभक्त होता, तो ज्ञानी पुरुष होता. असा रावण जर अल्लाउद्दीन खिलजी सारखा दाखवला तर कुणालाही त्याचा राग येईलच.

आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मितीमागे खोडसाळपणा

रामायणावर जपानमध्ये बनवलेली ऍनिमेटेड कलाकृती या आदिपुरुष चित्रपटापेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे. रामानंद सागर यांनी बनवलेल्या रामायणाच्या समांतर ते ऍनिमेटेड रामायण केले असल्याचा भास होतो. यावरून जपानमध्ये आपल्यापेक्षा चांगला रामायणाचा अभ्यास केला, असे म्हणायला वाव आहे. ऍनिमेटेड इमेज बनवणे अवघड असते. पण तरीही हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडत आहे. यामध्ये टारझन चित्रपटातील ऍनिमेटेड सीन फ्रेम टू फ्रेम उचलले आहेत. युट्युबवर याची तुलना दाखवली आहे. आदिपुरुष सारखे चित्रपट बनवण्याचे कृत्य कारण्यामागेही छुपा व्यावसायिक हेतू दडलेला आहे. पहिला खोडसाळणा करायचा, त्याच्याविषयी विरोधी मत तयार करायचे, त्यानंतर लोकांना ते बघण्यासाठी उद्युक्त करायचे, अशा वेळी प्रेक्षक वर्गात एक असा मोठा भाग आहे, जो संबंधित चित्रपटाबाबत वाद निर्माण झाल्यामुळे त्या चित्रपटात काय दाखवले आहे, हे उत्सुकतेपोटी बघायला जातो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येतील देशामध्ये ५ टक्के लोकांनी जरी असा विचार करून ते चित्रपट पाहायला गेले, तरी त्यांचे ५०० कोटी वसूल होतात. आदिपुरुष सारखा चित्रपट काढण्यामागे हे व्यावसायिक धोरण असू शकते. तसेच हा व्यापक कटाचा भागदेखील असू शकतो. समाजातील उजव्या विचारांच्या लोकांचे जे आदर्शवत व्यक्तिमत्व आहेत, अशा व्यक्तिमत्वाची डाव्या विचारांचे लोक टिंगलटवाळी करतात. यामध्ये अगदी स्वातंत्र्यावीर सावरकर यांना माफीवीर ठरवणे यासारखी बाब असेल किंवा आताच्या आदिपुरुष चित्रपटात पौराणिक व्यक्तिरेखांचे केलेले विडंबन असेल. या चित्रपटाच्या विरोधात काहीजण कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यांना पाठिंबा दिला पाहिजेच. पण दुसरीकडे प्रेक्षकांनीही या चित्रपटाकडे पाठ फिरवावी.

योगेश सोमण (लेखक ज्येष्ठ अभिनेते आहेत…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.