नमामि चंद्रभागा अजूनही केवळ कागदावरच; बैठकीनंतरही कामाबाबत कोणीच बोलेना!

सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील नद्यांमधील जल प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने घोषित केलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प नमामि चंद्रभागाला ग्रहण लागले आहे. या प्रकल्पाची जबाबदारी असणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्या आठवड्यात प्रकल्पाची आठवण झाली. मात्र त्यानंतरही प्रत्यक्षात नदीपात्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या या प्रकल्पाचे काम कधी सुरु होणार, याबाबत कोणीच उत्तर दिलेले नाही. बैठकीत हा विषय थोडक्यातच आटोपला गेल्याची माहिती अधिका-यांकडून मिळाली. प्रकल्प आराखडा मंजूर होण्याआधीच व्हिजन अर्थ केअर या कंपनीला २२ लाख रूपयांचे हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आलेले आहे. आता आठवड्याभरात यातील तांत्रिक त्रुटी दुर करून या प्रकल्पाला मंजूरी घ्यावी अशा सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कंपनीला देण्यात आल्या आहेत.

फ्लेमिंगोच्या आश्रयस्थानातच सांडपाणी प्रक्रिया केंद्र

नमामि चंद्रभागा या प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील इतर नद्यांमधील जलप्रदूषणावरही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवण्याचा सरकारचा विचार आहे. हा प्रकल्प दिशादर्शक प्रकल्प म्हणून ओळखला जात असताना गेल्या चार वर्षांत या प्रकल्पाची एकही वीट रचली गेलेली नाही. पुण्यातील पाच ग्रामपंचायतीपैकी भिगवण येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रात तयार करण्याचा प्रस्ताव असल्याने या ग्रामपंचायतीतील सांडपाणी थेट फ्लेमिंगोच्या आश्रयस्थानाला धक्का पोहोचवत असल्याचे दिसून आले. परिणामी आता दुस-याच ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

भिगवण वगळता इतर चार गावांच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांसाठीची निविदा प्रक्रिया लवकरच राबवली जाईल, यासाठीच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती आयुष प्रसाद यांनी दिली. निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर प्रकल्प आराखड्यासाठी काम करणाऱ्या कंपनीच्या नावावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शिक्कामोर्तब होईल, असेही आयुष प्रसाद यांनी सांगितले. निविदा प्रक्रियेची जाहिरात आठवड्याभरातच दिली जाईल, अशा सूचना व्हिजन अर्थ केअर कंपनीला देण्यात आल्या आहेत.

१५० गावांच्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न

पाच ग्रामपंचायतीच्या लगतच्या १५० गावांमधील घनकचरा व्यवस्थापनाचेही आव्हान अजून कायम आहे. यासाठी जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका तसेच ग्रामीण विकास विभाग एकत्रित काम करणार आहेत. नदीलगच्या नागरी वस्तीतील कचरा नदीपात्रात टाकला जाणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही आयुष प्रसाद म्हणाले. याकरिता पुरेसे मनुष्यबळही नियुक्त केले जाईल. नदीपात्रातील छोट्या गावांतूनही सांडपणी थेट नदीपात्रात सोडले जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही आयुषप्रसाद म्हणाले. नदीपात्राजवळ मातीची धूप होऊ नये, यासाठी सीएसआर फंडातून मनरेगा रोगजार योजनेच्या माध्यमातून सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने वृक्षलागवड केली जाईल, अशी माहिती आयुष प्रसाद यांनी दिली.

रिसॉर्टवर कारवाई

चंद्रभागा नदीच्या काठावरील रिसॉर्टकडून सांडपाणी प्रक्रिया न करता थेट पाणी नदीपात्रात सोडण्यात आले, तर रिसॉर्टवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुषप्रसाद यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here