सापासोबत स्टंट पडला भारी, वनविभागाने नेले न्यायालयाच्या दारी

99

स्वयंघोषित सर्पमित्र असलेल्या तरुणाने शरीरावर साप ठेवत सार्वजनिकरित्या प्रदर्शन केल्याप्रकरणी वनविभागाने अटक केल्याची घटना मालाड परिसरात घडली. अयान खान असे या तरुणाचे नाव असून, त्याने लोकांच्या गर्दीसमोर साप खांद्यावर घेऊन प्रदर्शन केल्याप्रकरणी वनविभागानेच या घटनेची दखल घेत कारवाई केली. या स्वयंघोषित सर्पमित्राला दिंडोशी न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला.

( हेही वाचा : आता शिक्षणही महागले! शाळांनी 25 ते 30 टक्के वाढवले शुल्क )

वनविभागाने घेतले ताब्यात 

मालाड येथील स्थानिक स्वयंघोषित सर्पमित्र असलेला अयान खान या तरुणाने दोन-तीन दिवसांपूर्वी सायंकाळी सापाला वाचवले. मात्र घटनेच्यावेळी लोकांची गर्दी जमली. लोकांची गर्दी पाहता स्टंटबाजी करत सापाला हाताळताना काहीच होत नाही, अशा आविर्भावात त्याने साप हातात घेऊन गर्दीसमोर पोझ दिले. साप पिशवीत भरतानाही त्याने गर्दीतील लोकांजवळ अगोदर साप नेला. हा प्रकार कित्येकांनी मोबाईलमध्ये कैद केला. समाजमाध्यमांवर हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागानेच त्याला ताब्यात घेतले, दंडाची रक्कम भरल्यानंतर गुरुवारी त्याची सुटका करण्यात आली.

साप या सरपटणा-या वन्यजीवाचे सार्वजनिक प्रदर्शन करता येत नाही. अशा प्रकारची स्टंटबाजी हा वनगुन्हा ठरतो. वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ नुसार साप हा चौथ्या वर्गवारीत संरक्षित आहेत. सापाला विनापरवाना पकडणे, बाळगणे, सार्वजनिक प्रदर्शन करणे या वनगुन्ह्याविरोधात पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.
– संतोष सस्ते, उपवनसंरक्षक, ठाणे वनविभाग (प्रादेशिक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.