अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचे काम पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू आहे. दरम्यान, राम भक्तांसाठी मोठी बातमी आली आहे. गर्भगृहाचे बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल आणि 2024 मकर संक्रांतीपर्यंत रामलल्ला गर्भगृहात विराजमान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या रविवारी झालेल्या बैठकीत बांधकामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी रामलल्ला मंदिरात बसण्याच्या वेळेचे मूल्यमापन करण्यात आले, त्यात ट्रस्टच्या सदस्यांनी आशा व्यक्त केली की, मंदिराचा पहिला मजला डिसेंबर 2023 पर्यंत बांधण्यात येईल. गर्भगृहाचे काम वेगाने सुरू असून, बांधकामात राजस्थान, हैदराबाद आणि इतर ठिकाणांहून आयात केलेले दगड वापरले जात आहेत. संपूर्ण मंदिर परिसरात आणखी 7 मंदिरे बांधली जाणार असल्याचेही समोर आले आहे.
राम मंदिराच्या उभारणीसाठी 1800 कोटी रूपये खर्च झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, मंदिराचे बांधकाम सुरू झाले तेव्हा त्याची किंमत 400 कोटी होईल, असा अंदाज होता. परंतु, 18 महिन्यांनंतर ही किंमत जवळपास 1800 कोटींवर येऊ शकते, असे बोलले जात आहे.