Ayodhya Ram Mandir : रामा चरणी जीवन अमुचे!

Ayodhya Ram Mandir : आर्यावर्तातील भूमीचा प्रत्येक कण श्रीराम भक्तांना आपल्या जीवनापेक्षा, आपल्या प्राणापेक्षा अधिक मौल्यवान वाटतो. म्हणूनच या भूमीच्या रक्षणार्थ आजपर्यंत अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले आहेत.

262
Ayodhya Ram Mandir : रामा चरणी जीवन अमुचे!
Ayodhya Ram Mandir : रामा चरणी जीवन अमुचे!
दुर्गेश जयवंत परुळकर

मूर्तिभंजकांनी आर्यावर्तातील असंख्य मंदिरांवर आक्रमण करून मूर्तिभंजन केले. (Ayodhya Ram Mandir) कोणतीही चांगली गोष्ट दुष्ट दुराचारी लोकांच्या पचनी पडत नाही. चांगल्या गोष्टीत नेहमीच बाधा निर्माण करणे ही दुराचारी लोकांची विकृत मनोवृत्ती अत्यंत घातक आहे. असत्य, अन्याय, अनैतिकता, अधर्म यांचे सहाय्य घेऊन क्रौर्याची परिसीमा गाठणे हा त्यांचा आवडता छंद असतो.‌ अशाच वृत्तीच्या बाबराने अयोध्या नगरीवर म्हणजेच श्रीरामांच्या जन्मभूमीवर आक्रमण करून श्रीरामांचे मंदिर नष्ट केले.‌ त्या जागेवर मशीद उभारून आपल्या विजयाचे स्मारक निर्माण केले. पवित्र असलेली श्रीरामांची जन्मभूमी या दुराचारी आक्रमकाने अपवित्र केली. त्या भूमीचे पावित्र्य जतन करण्याचा प्रयत्न श्रीराम भक्तांनी आरंभला.‌

या आर्यावर्तातील भूमीचा प्रत्येक कण श्रीराम भक्तांना आपल्या जीवनापेक्षा, आपल्या प्राणापेक्षा अधिक मौल्यवान वाटतो. म्हणूनच या भूमीच्या रक्षणार्थ आजपर्यंत अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले आहेत. रक्त सांडले आहे, शौर्य गाजवले आहे; पण शत्रूच्या पुढे नतमस्तक होऊन लाचारी पत्करली नाही.‌ स्वत्व आणि स्वाभिमान जपला.‌ अत्याचाराला प्रत्याचाराने उत्तर दिले.‌ आपल्या देशाची ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरा अबाधित राहावी म्हणून रामभक्त सर्वस्व पणाला लावू इच्छितात कारण त्यांनी आपले संपूर्ण जीवन श्रीराम चरणी अर्पण केले आहे.‌ या भारतभूमीत श्रीरामांची असंख्य मंदिरे असली तरी आम्हा राम भक्तांसाठी प्रत्येक मंदिर हा अमूल्य ठेवा आहे.‌

(हेही वाचा – Public Holiday : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर)

शेकडो वर्षांचा संघर्ष पूर्णत्वास

कोणतेही कारण नसताना एखादा उपरा येतो आणि आमचे राम मंदिर नष्ट करून जातो. त्याचे हे कृत्य म्हणजे आम्हा सर्व रामभक्तांच्या श्रद्धास्थानावर केलेला आघात आहे. तसेच श्रीरामांचे अस्तित्व नष्ट करण्याचा उद्दामपणा आहे.‌ म्हणूनच श्रीरामांची जन्मभूमी त्यांच्या मंदिराने सुशोभित करणे, पवित्र करणे हे आम्हा रामभक्तांचे जीवन ध्येय आहे.‌ कारण त्यांच्या चरणी आम्ही रामभक्तांनी आमचे जीवन समर्पित केले आहे. श्रीरामांवाचून आमच्या जीवनाला काहीही अर्थ नाही.‌ आमच्या जीवनाला अर्थ प्राप्त व्हावा या हेतूनेच श्रीरामांच्या जन्मभूमीवर त्यांचे मंदिर सन्मानाने पुनश्च निर्माण करणे हे आम्हा रामभक्तांचे परम कर्तव्य आहे. हा श्रीरामांविषयीचा आदर भाव, श्रद्धा भाव आम्हा राम भक्तांच्या रोमारोमांत वसला आहे. म्हणूनच आम्ही रामभक्तांनी शेकडो वर्षे संघर्ष करून अयोध्या नगरीत श्रीरामांचे मंदिर निर्माण करण्याचा संकल्प केला तो आता पूर्णत्वास पोहोचला आहे.

अयोध्या (Ayodhya) नगरीतील राम भक्तांनी बाबराशी युद्ध करून श्रीरामांचे मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी प्राण अर्पण केले. त्यानंतर आलेल्या अत्याचारी परकीय आक्रमकांशी सातत्याने संघर्ष करावा लागला. असा हा संघर्ष किमान पाचशे वर्षांचा आहे.‌ या प्रदीर्घ काळात अनेकांनी श्रीरामांच्या मंदिराच्या निर्मितीसाठी अपार त्याग केला आहे.

बाबराने निर्माण केलेले त्याचे विजय स्मारक रामभक्तांनी भुईसपाट करून त्या परकीय आक्रमकांच्या अत्याचारांवर आम्ही विजयाचा शिक्का उमटवला. श्रीरामांच्या मंदिराचे जे पतन करण्यात आले त्याचा प्रतिशोध घेतला.‌

वास्तविक हा विजयाचा आनंद आपल्या देशातल्या सत्ताधीशांना होणे नितांत आवश्यक होते.‌ तथापि दुष्ट दुराचारी लोकांच्या चरणी ज्यांनी आपली निष्ठा समर्पित केली अशा सत्ताधीशांना रामभक्त शत्रू वाटले. म्हणून बाबरी मशीदीचे पतन होताच श्रीराम भक्तांना शरयू नदीत बुडवण्यात आले.‌

(हेही वाचा – Ram Mandir: गर्भगृहात विराजमान रामलल्लाच्या चेहऱ्याचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध, २३ जानेवारीपासून भाविकांना नवीन मंदिरात घेता येणार दर्शन)

भक्त आणि देव यांच्यातला अनोखा करार

वर्ष १५२८ पासून सुरू असलेला संघर्ष रामभक्तांना प्रेरणा देत राहिला. कितीही संघर्ष करावा लागला, तरी रामभक्तांनी हार मानली नाही. श्रीराम चरणी तन, मन, धन अर्पण केलेल्या राम भक्तांना मृत्यूचे भय नव्हते. त्यामुळे कोणीही माघार घेतली नाही. जोपर्यंत श्रीरामांचे मंदिर त्यांच्या जन्मभूमीवर सन्मानाने आपण उभे करत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही. ही प्रतिज्ञा श्रीरामाच्या भक्तांनी केली होती. तसे वचनही रामभक्तांनी एकवचनी रामाला दिले होते. भक्त आणि देव यांच्यातला हा अनोखा करार होता. ज्या श्रीरामाने आपले वचनभंग केले नाही त्या श्रीरामांच्या भक्तांनी आपल्या आराध्य देवतेला दिलेले वचन भंग होणार नाही याची काळजी घेतली. त्यासाठी आपले प्राण अर्पण केले. श्रीरामांच्या चरणी संपूर्ण जीवन समर्पित केले, त्या श्रीरामांच्या वाचून जीवनाला काहीच अर्थ नव्हता. ही भावना श्रीराम भक्तांची होती. या उत्कट भक्ती भावनेला नष्ट करण्याचे सामर्थ्य कोणत्याही दुष्ट, दुराचारी, राक्षसी प्रवृत्तीच्या समाजाकडे असणेच शक्य नाही. त्याची प्रचिती आज येत आहे.

श्रीरामांचे कोट्यवधी भक्त आहेत. त्या सर्व भक्तांनी एकत्रितपणे हा लढा चालू ठेवला. त्यासाठी श्रीरामांच्या भक्तांना न्यायालयातही संघर्ष करावा लागला. सत्याची बाजू असूनही विविध प्रकारचे पुरावे सादर करावे लागले; पण कोणीही मागे हटले नाही.

श्रीरामांची जन्मभूमी ही श्रीरामांची जन्मभूमी आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरातत्त्व खातेही (Archaeological Survey of India) पुढे सरसावले. या पुरातत्त्व खात्याच्या प्रयत्नामुळे श्रीरामांची जन्मभूमी ही श्रीरामांचीच जन्मभूमी आहे हे आपण सिद्ध करू शकलो. त्यासाठी पुरातत्त्व खात्यातील रामभक्तांनी अपार कष्ट घेतले.‌ रात्रीचा दिवस केला. सर्वांच्या शंकाकुशंका दूर करण्यासाठी भूमातेला प्रार्थना करावी लागली. भूमातेच्या उदरात गडप झालेले सर्व पुरावे भूमातेने उदार हस्ते श्रीराम भक्तांच्या हाती दिले. भूमाता ही रामभक्तांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. दुष्ट, दुराचारी लोकांनी श्रीरामांचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरला.‌ प्रभू श्रीरामचे आपल्या भक्तांचे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिले, असा विश्वास श्रीराम भक्तांच्या अंत:करणात आजही तेवढाच प्रबळ आहे.‌

(हेही वाचा – अटल सेतू : एक अभियांत्रिकी चमत्कार)

रामभक्तांनी दिला जागता पहारा

श्रीराम जन्मभूमीच्या ठिकाणी असलेली श्रीरामाची मूर्ती तिथेच प्रस्थापित केली आणि पूजाअर्चा चालू ठेवली.‌ देशात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी म्हणून शासनाने त्या स्थानाला कुलूप लावून ते बंद केले; पण परकीय आक्रमकांची मशीद मात्र तशीच मोकळी ठेवली.‌ पण यामुळे श्रीराम भक्त हताश, निराश झाले नाहीत. श्रीरामांची मूर्ती तिथून हलवण्याचा आदेश सरकारने दिला पण त्या आदेशाचे पालन रामभक्तांनी केले नाही.‌ त्या मूर्तीच्या रक्षणार्थ श्रीरामांची सेवा रामभक्तांनी आरंभली. चोवीस तास अखंडपणे किर्तन चालू होते. या कीर्तनाला अबाल, तरुण, वृद्ध, स्त्री-पुरुष सर्वजण आपली उपस्थिती लावत होते.‌ श्रीराम भक्तांचा ओघ जराही कमी झाला नाही.‌ श्रीरामांच्या या उपासनेमुळे सर्वांचे मन शांत राहिले आणि श्रीरामांच्या मंदिराचे रक्षण रामभक्तांना करता आले.‌ श्रीराम मंदिराचे स्थान सुरक्षित राहण्यासाठी सर्व रामभक्तांनी जागता पहारा दिला.‌

सर्वसामान्य जनतेसह अनेक खासदार, आमदार असे लोकप्रतिनिधी रामभक्त होतेच. तेही या लढ्यात सहभागी झाले.‌ संत, महंत, साध्वी, संन्यासी सर्वांनीच एकत्रितपणे सुसंघटित होऊन श्रीरामांचे मंदिर पुनश्च निर्माण व्हावे म्हणून आपापले योगदान दिले.‌ त्यांचा त्याग, त्यांची निष्ठा, त्यांचे कार्य अनमोल आहे. त्या सर्वांनीच आपले जीवन श्रीराम चरणी अर्पण केले.

देशातल्या सर्व रामभक्तांना अयोध्या नगरीत जाऊन श्रीरामांची सेवा करणे शक्य नव्हते. तरीही त्यांनी धनधान्य अशा विविध मार्गाने राम मंदिर निर्मितीसाठी आपापला खारीचा वाटा उचलला.‌ श्रीरामांवरची असलेली श्रद्धा जोपर्यंत श्रीराम मंदिर उभे राहत नाही तोपर्यंत सर्वांनाच अस्वस्थ करत होती.

(हेही वाचा – Sam Pitroda on Ram mandir : अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणाऱ्या कॉंग्रेसचे सॅम पित्रोदा म्हणतात, हिंदु राष्ट्र निर्माण करायचे कि धर्मनिरपेक्ष राष्ट्र ते ठरवा)

श्रीराम आणि श्रीकृष्ण आपल्या जीवनाचे आधारस्तंभ

न्यायालयात चालू असलेला लढा हळूहळू आकाराला येत होता. मंदिराच्या अस्तित्वाचे पुरावे न्यायालयात सादर होत होते. अधिवक्त्यांनी त्यांचे काम चोख बजावले. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले ‘रामायण’ (Ramayana) आणि गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेले ‘रामचरितमानस’ (Ramcharitmanas) हे रामभक्तांनीच लिहिलेले दोन ग्रंथ श्रीरामांचे अस्तित्व सिद्ध करण्यास उपयुक्त ठरले. त्याचा अभ्यास करून त्यातील पुरावे न्यायालयात सादर करण्याचे कामही रामभक्तांनी केले. आपल्या आयुष्यातला प्रदीर्घकाळ अनेकांनी श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी व्यतित केला. त्यासाठी कोणीही कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवली नाही; कारण सर्वच राम भक्तांनी आपले जीवन श्रीराम चरणी समर्पित केले होते. श्रीरामांच्या अस्तित्वातच आपले अस्तित्व आहे याची जाणीव त्यांना होती. या जाणीवेमुळेच हा लढा अखंड चालू राहिला.

हिंदू संस्कृती, हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी परकीय आक्रमकांनी जाणीवपूर्वक हिंदू समाज प्रज्ञाहत करण्याचा प्रयत्न केला.‌ त्यासाठी शिक्षण पद्धती, शिक्षण व्यवस्था, इतिहास बदलला. तरीही रामभक्तांनी रामायण, महाभारत हे ग्रंथ अभ्यासण्याचे सोडले नाही. श्रीराम आणि श्रीकृष्ण आपल्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत. हे संस्कार, ही परंपरा आपणच जतन केली पाहिजे याची प्रबळ जाणीव रामकृष्णाच्या भक्तांच्या अंत:करणात सजग होती.

जीवन मूल्यांचे जतन करण्याचे काम श्रीरामांनी केले, त्यासाठी त्यांनी वनवासही भोगला. श्रीरामांच्या या आदर्श जीवनाचे संस्कार रामभक्तांवर झाले होते.‌ रामभक्तांनीसुद्धा जीवन मूल्यांच्या रक्षणासाठीच शेकडो वर्षे संघर्ष केला. अन्याय, अत्याचार, असत्य, अधर्म, अनैतिकता यावर मात केली. विजय संपादन केला. व्यक्तिगत नावाला महत्त्व न देता रामभक्त हेच नाव धारण करून श्रीराम मंदिर निर्मितीचे ध्येय गाठण्यासाठी सर्व प्रकारचा त्याग करणारे रामभक्त आज ‘प्रभू रामचंद्र की जय’ अशी गगनभेदी गर्जना करत आहेत.‌

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir ATS : प्रतिष्ठापने पूर्वी उत्तर प्रदेश ATS ने तीन संशयितांना पकडले; चौकशी सुरू)

सहस्रावधी मंदिरे पुन:श्च निर्माण करण्याची प्रेरणा

या राम मंदिरासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले ते रामभक्त आणि ज्यांना यमाने आपल्या पाशाने बद्ध करून या भूतलावरून नेले ते सर्व आज स्वर्गलोकांतून श्रीरामांच्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी आतुरले असतील.‌ कारण त्यांनीही आपले संपूर्ण जीवन श्रीरामांच्या चरणी समर्पित केले.

सहस्रावधी वर्षांनंतर एवढा मोठा सोहळा पाहण्याचे भाग्य आपल्या सर्वांना लाभल्याने आपले जीवन सार्थकी लागले हे समाधान, हा आनंद शब्दातीत आहे.

अयोध्येत निर्माण होत असलेले राम मंदिर हे केवळ दगडांनी निर्माण झालेले किंवा निर्माण करण्यात आलेले मंदिर नाही. या मंदिराचा पाया आपल्या श्रेष्ठतम सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा आहे. हे मंदिर कर्तव्यनिष्ठा, प्रतिकारनिष्ठा, धर्मनिष्ठा, संस्कृतीनिष्ठा, ध्येयनिष्ठा, भक्ती, त्याग या आणि अशा स्तंभांवर उभे राहिले आहे. या मंदिरात संपूर्ण मानवी समाजाला प्रेरणा देणारे श्रीराम विराजमान होत आहेत. या मंदिराचा कळस श्रीरामांच्या तेजस्वी चारित्र्याचा, शौर्याचा, पावित्र्याचा आहे.

अशा श्रीरामाच्या मंदिराने आरंभलेले हे कार्य परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली सहस्रावधी मंदिरे पुन:श्च नव्याने निर्माण करण्यासाठी प्रेरणा देत राहणार आहे.‌ याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. (Ayodhya Ram Mandir)

(लेखक व्याख्याते आहेत.)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.