– डॉ. प्रिया सावंत, मानसशास्त्रज्ञ
‘राम’ या शब्दाचे अनेक अर्थ सांगितले जातात त्यातला एक म्हणजे ‘रमते कणे कणे इति रामः|’ जे कणाकणात रमण करतात (राहतात/असतात) त्यांना राम म्हणतात. हजारो वर्षांनंतरदेखील लाखो लोकांसाठी प्रेरणादायी असलेलं रामाचं व्यक्तिमत्त्व, रामाचं अस्तित्व हे राम मंदिराच्या रूपाने पुनर्प्रस्थापित होत आहे. सर्व भारतीयांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. राम मंदिराच्या निमित्ताने रामासारख्या युगपुरुषाची ओळख नव्या पिढीला सहजतेने होत आहे. त्याद्वारे विकसनशील भारताचा पाया हा संस्कृती मूल्यांच्या संवर्धनामुळे मजबूत होत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कुठेतरी नष्ट होत चालणारी नीतिमूल्ये आणि संस्कार यांच बाळकडू नव्या पिढीपर्यंत सहजपणे पोहोचत आहे. भविष्यातील नवभारत हा संस्कारक्षम व संस्कृतीप्रधान घडवण्याच उद्दिष्ट साध्य होताना दिसत आहे. (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha)
नव्या पिढीने मर्यादा पुरुषोत्तम,धैर्यशील अशा श्रीरामांकडून काय शिकावं?
जीवनात आलेल्या कठीण प्रसंगांमध्ये प्रभू श्रीरामांनी कधीही भावनिक समतोल ढळू दिला नाही. धैर्य, संयम, शालीनता आणि कर्तव्य पारायणता हे गुण रामाच्या व्यक्तिरेखेला उदात्त बनवतात. राजाचे कर्तव्य पार पाडताना,प्रजेसाठी दिलेल्या चुकीच्या निर्णयापायी त्रास सोसणाऱ्या सीतेशी एकनिष्ठ राहणारा राम आजकालच्या असंवेदनशील समाजाला बरंच काही शिकवून जातो.
राम मंदिर आणि लोकांचे एकत्रीकरण
चार वर्षांपूर्वीच्या करोनाच्या कठीण काळात कुटुंबाचे महत्त्व लोकांना पटलं मानवतेचे महत्त्व पटलं. टेक्नॉलॉजीने पछाडलेल्या तरुणाईला काही काळा काही काळापूर्ती का होईना पण घरातल्या थोरामोठ्यांची साथ लाभली सवय लागली. जीवाच्या भीतीने का होईना,पण घरच्यांना पूजा पाठ करताना युवा पिढीने पाहिलं आजी-आजोबांकडून रामायणातल्या गोष्टी नातवंडांपर्यंत पोहोचल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीचं बळ काय असतं हे लोकांना उमजलं. वाईटातून काहीतरी चांगलं घडतं असं म्हणतात. पाश्चातीकरणाच्या,आधुनिकीकरणाच्या मागे लागलेल्या युवापिढीला हिंदुत्वाचं, हिंदू संस्कृतीचं महत्त्व याच काळात कदाचित जाणवलं असावं. 31 डिसेंबर पेक्षाही 22 जानेवारीचा राम मंदिर उत्सव साजरा करण्यासाठीचा उत्साह आणि उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. तरुण पिढी रामनाम जपत आहे, आनंदाने अक्षत वाटप करत आहे, मोबाईलच्या आणि वायफायच्या नेटवर्कमध्ये गुरफटलेली ही पिढी लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या आपुलकीचा प्रेमाचा अगत्याचा आस्वाद घेत आहे. हे दृश्य जुन्या पिढीच्या लोकांसाठी अतिशय आल्हाददायक असं आहे. सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने आश्वासक आहे.
राम मंदिर आणि सकारात्मक ऊर्जा
रामध्वजाचा झळकणारा भगवा रंग सगळीकडे वेगळ्याच ऊर्जेचं स्त्रोत बनला आहे. मंदिरे स्वच्छ होत आहेत. लोकनेते स्वतः जातीने स्वच्छते मोहिमेत सहभागी होत आहेत. सफाई अभिमान जोरात चालू आहे. नुसती परिसरातच नाही तर मानसिक स्वच्छताही होत आहे. कारण राम मंदिराच्या उत्सवात केवळ हिंदूच नाही तर इतर धर्मीय ही तेवढ्याच उत्साहाने सहभागी होताना दिसत आहेत. सदाचार आणि नीतिमत्ता जनमानसात वृद्धिंगत व्हावी यासाठी हा एकत्रित प्रयत्न आहे. पहाटेपासून रात्रीपर्यंत आबाल वृद्ध या मोहिमेत कार्यरत असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीसही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे. नैराश्य, नकारात्मकता निवळून नवचैतन्याची लहर सर्वत्र अनुभवायला मिळत आहे.
ठिकठिकाणी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे रामायण लोकांपर्यंत पोहोचत आहे. देशात सर्व मार्गावर भिंतींवर चित्रे रंगवण्यात आली आहेत. भारताचे शाश्वत जीवन, सांस्कृतिक वारसा, कला आणि भारत सर्वत्र विकासाच्या मार्गीवर चालल्याची झलकही या मध्ये पाहायला मिळणार आहे. कलाकृतींमध्ये रामायण, महाभारत आणि विष्णू अवतार पाहायला मिळणार आहे. रामायणावर आधारित खेळणी, विविध खेळ, व्हिडिओ गेम्स, गोष्टीची पुस्तके, कार्टून्स याद्वारे अनभिज्ञ असलेल्या आधुनिक पिढीला रामाची ओळख करून देण्याचा सक्षम आणि सफल प्रयत्न सुजाण पालकांद्वारे होत आहे.
राम मंदिर – राष्ट्र मंदिर
श्रीराम मंदिर हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी बांधलेले मंदिर आहे. राम मंदिर हे नुसतं मंदिर नव्हे तर ते हिंदुत्वाचं प्रतीक आहे. लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. जनजागृतीचे कार्य आहे. हिंदू धर्म हा सनातन धर्मास पूरक आणि प्रेरक आहे आहे. सनातन ही एक प्राचीन जीवनपद्धती असून, जातीय रचनेतून निर्माण झालेल्या समाजाचा या जीवन जगण्याच्या पद्धतीशी काहीएक संबंध नाही. सनातन धर्म ही एक प्राचीन संस्कृती आहे. मानवतावादी आहे.जीवन जगण्याचा तो एक मार्ग आहे. आपण देवांचा, आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाशी प्रेमाने, करुणेने वागले पाहिजे हेच यामध्ये सांगितलं आहे. सर्वधर्मसमभाव असलेला भारतीयांचा हिंदू धर्म, भारताची धर्मनिरपेक्षतेची संकल्पना दर्शवतो. यामध्ये कोणतीही धार्मिक ओळख नसलेल्या लोकांचा स्वीकार, विविध प्रथा अथवा पद्धतींचा स्वीकार अंतभूत आहे. म्हणजेच वैज्ञानिक उपक्रम, मानवतावाद, माणुसकी यासारख्या धर्मनिरपेक्ष मूल्यांना बांधील असलेल्यांचा समावेश होतो.
राम मंदिर आणि चारित्र्यवान समाज निर्मिती
राम मंदिराच्या निमित्ताने भारतीय समाज मोठ्या प्रमाणावर एकत्रित आला आहे. लोकांमध्ये असलेली एकता ही त्या समाजाच्या आणि देशाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे. जर समाज एकत्र असेल तरच ते राष्ट्र बलाढ्य ठरते. विविधतेतील एकता हा नैतिकता आणि नैतिकतेचा अविभाज्य भाग आहे. मानवी समाजाच्या भविष्यातील प्रगतीसाठी ही संकल्पना निश्चितच आवश्यक आहे. 160 देशांत राम मंदिर उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने करोडो लोक या आनंदोत्सवात जगभरातून सहभागी होणार आहेत.
संत तुलसीदासांनी प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येचं वर्णन आपल्या दोह्यामध्ये अतिशय सुंदरपणे केलं आहे –
‘काम कोह मद मान न मोहा । लोभन छोभ न राग न द्रोहा ॥
जिन्हके कपट दंभ नाही माया । तिन्ह के हृदय बसहूं रघुराया ॥’
दोषांपासून व विकारांपसून मुक्त व संस्कारांनी युक्त, व्यक्तीगत चारित्र्ययुक्त समाजव्यवस्था असलेली अशी ही अयोध्या आहे. राम मंदिर हे निव्वळ धार्मिक नसून जागतिक एकात्मतेचे धोरण आहे. राम मंदिर ,चारित्र्यवान आणि संस्कारक्षम समाज निर्मितीचा व्यापक दृष्टिकोन आहे. वैश्विक स्तरावर आनंददायी, सुखदायी, मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्मितीचा सृजनशील प्रयत्न आहे. श्रीरामांचे गुण पुन:श्च जाणून घेऊन, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भारतामध्ये रामराज्य प्रस्थापित करून जागतिक स्तरावर भारतास सार्वभौमत्व प्राप्त होईल यात शंका नाही.
जय श्रीराम!
(लेखिका मानसोपचार तज्ज्ञ आणि कॉर्पोरेट ट्रेनिंग एक्स्पर्ट आहेत.)