देशभरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. काही तासांतच रामलल्लाची मूर्ती अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात विराजमान होणार आहे. राम मंदिर निर्मितीसाठी (Ayodhya Ram Mandir) केलेल्या आंदोलनात विदर्भाचे (vidarbha) योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.
प्रभू श्री रामचंद्राचे विदर्भातील कौंडण्यपूर गावासोबत खास नाते आहे. याची नोंद इतिहासकारांनी रामायणासह अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजांमध्ये केली आहे. विदर्भाची राजकुमारी इंदुमती अर्थात प्रभु श्रीरामचंद्रांची आजी कौंडण्यपुरातील असल्याने अमरावती जिल्ह्यात राम मंदिर उद्घाटनाचा अवर्णनीय उत्साह सुरू आहे. प्रभु श्री रामचंद्र यांचे वडील दशरथ राजा यांची आई इंदुमती. राणी इंदुमती विदर्भातील राजा भोज यांच्या बहीण होत्या. राणी इंदुमती यांचं लग्न करण्यासाठी स्वयंवराचे आयोजन करण्यात आले होते.
विदर्भात उत्साहाला उधाण
राणी इंदुमती हातात वरमाला घेऊन आल्या त्यावेळी भव्य सभामंडपात अनेक राज्यातील पराक्रमी सौंदर्यवान राजकुमार उपस्थित होते. प्रत्येक राजकुमाराजवळ त्या जात असताना त्यांची मैत्रिण सुनंदा या प्रत्येक वराचं वर्णन त्या सांगत होत्या. या प्रक्रियेदरम्यान राणी इंदुमती यांनी ईश्वांकू वंशाचे राजकुमार अज यांना त्यांनी वरमाला घातली आणि धूमधडाक्यात विवाह संपन्न झाला. कालांतराने राजा रघु यांनी परंपरागत रीतीरिवाजानुसार राज्याची धुरा राजकुमार अज यांच्या हाती दिली. त्यानंतर ते वानप्रस्थाश्रमी गेले. राजा अज आणि राणी इंदुमती यांच्या पुत्राचं नाव दशरथ अर्थात प्रभु श्रीरामाचे वडील. त्यामुळे विदर्भासोबत प्रभु श्री रामचंद्रांचं विशेष नातं असल्यामुळे विदर्भात उत्साहाला उधाण आलं आहे.