Ayodhya Ram Mandir : मंदिर मुक्ती आंदोलन आणि बाळाराव सावरकर!

Ayodhya Ram Mandir : अनेक वर्षे आचार्य बाळाराव सावरकर नित्यनियमाने न्यायालयात उपस्थित राहून बाजू मांडत होते. तेव्हा हा खटला जिवंत ठेवला गेला म्हणून आज हा दिवस पाहायला मिळत आहे.

381
Ayodhya Ram Mandir : मंदिर मुक्ती आंदोलन आणि बाळाराव सावरकर!
Ayodhya Ram Mandir : मंदिर मुक्ती आंदोलन आणि बाळाराव सावरकर!

क्रांतिगीता महाबळ

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्वीय सहाय्यक आणि मानसपुत्र शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराव सावरकर! (Balarao Savarkar) (स्वातंत्र्यवीर धाकट्या भावाला डॉ. नारायण दामोदर सावरकर यांना बाळ, बाळाराव असे संबोधत. त्यामुळे कधी कधी दोन बाळारावांमध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ होत असे. त्या दोघांचे कर्तृत्वही खूप मोठे आहे.) श्री. शांताराम शिवराम उपाख्य आचार्य बाळाराव सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्रकार, हिंदू महासभेचे नेते, उत्तम व्याख्याते अशा विविध गुणांनी सुपरिचित होते. सन १९८७ ते १९८९ या कार्यकाळात अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना आचार्य बाळाराव सावरकर यांनी फैजाबाद न्यायालयात अयोध्या राम जन्मभूमी खटला लढवला. अनेक वर्षे ते नित्यनियमाने न्यायालयात उपस्थित राहून बाजू मांडत होते. तेव्हा हा खटला जिवंत ठेवला गेला म्हणून आज हा दिवस पाहायला मिळत आहे. (Ayodhya Ram Mandir)

(हेही वाचा – Public Holiday : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर)

…आणि श्रीरामाची मूर्ती प्रकटली

हिंदू महासभेने (Hindu Mahasabha) केलेले प्रचंड मोठे कार्य आणि आंदोलनांमध्ये त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असायचा. त्यापैकी हे राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन. परमहंस रामचंद्रदास हे हिंदु महासभेचे कार्यकर्ते. २३ डिसेंबर १९४९ या दिवशी रामलल्लाची मूर्ती त्यांच्यासमोर प्रकट झाली. सहस्रावधी लोक जमा झाले. श्रीरामाचा आणि हिंदु धर्माचा जयजयकार सुरू झाला. तेव्हापासून देशभर जनजागृती, आंदोलने, मिरवणुका आणि त्याचबरोबर न्यायालयीन लढाही सुरू झाला. श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा आणि काशी विश्वेश्वर या मोठ्या हिंदू मंदिरांच्या मुक्तीसाठी हिंदू महासभेने सर्वप्रथम चळवळ सुरू केली.

श्रीराम मंदिर निर्माणाचा आनंद घेताना बाळारावांसारख्या नेत्याला विनम्र अभिवादन !

पंडित मदनमोहन मालवीयजी, भाई परमानंद, लाला लजपतराय हे प्रारंभी हिंदू महासभेचे नेते आणि मार्गदर्शक होते. या सर्व ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली कार्य करताना हिंदू तरुणांची नवीन पिढी त्या कार्यासाठी सिद्ध होत होती. १९५० ते १९६६ या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर अनेक प्रकारच्या सामाजिक, राजकीय कार्यात सहभागी होते. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाची व्यवस्था बाळाराव करत. त्यांच्या बरोबरीने सहभागी होत. वृत्तांत लिहून ठेवणे, पत्रके प्रकाशित करणे, कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून योजना कार्यान्वित करणे ही बाळरावांची कार्ये ते नेटकेपणाने करीत. त्यांनी १८ वर्षे ‘हिंदू’ साप्ताहिकाचे संपादन केले. त्यातून हिंदू संघटनांविषयी आणि मंदिर मुक्ती आंदोलनाविषयी (Temple Liberation Movement) अनेक लेख लिहिले. जागोजागी भाषणांचे दौरे करून जनजागृती केली. १९४८ मध्ये गांधी वधानंतरच्या प्रचंड दडपशाहीतही हिंदू महासभा, हिंदुत्व आणि हिंदूहिताच्या रक्षणार्थ संघटन, आंदोलने सुरूच राहिली. याचे फार मोठे श्रेय हिंदू महासभेच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना, नेत्यांना जाते. त्यात बाळाराव सावरकर हे नाव प्रकटपणे झळकत आहे. यश, लौकिक, सन्मान यांच्या मोहात न पडता निरलसपणे सातत्याने राष्ट्रहिताची साधना करत राहणे ही अत्यंत अवघड गोष्ट त्यांनी आयुष्यभर केली.

(हेही वाचा – Rammandir Ayodhya : 22 जानेवारीला सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार का ?; केंद्रीय राज्यमंत्री काय म्हणाले…)

बाळाराव सावरकर स्वतः उत्तम वक्ता होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) विचारांचा आणि हिंदुत्वाचा प्रचार ते आपल्या भाषणांतून, लेखांतून प्रभावीपणे करत असत. विशेषतः तरुण मंडळे, महाविद्यालयातील मराठी मंडळे त्यांना भाषणासाठी आमंत्रित करत असत. हिंदू संघटनांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उत्तमोत्तम काव्ये रचली. व्याख्यानासाठी जाताना बरेचदा बाळाराव सावरकर मला बरोबर नेत. १. तुम्ही आम्ही सकल हिंदू! बंधू बंधू!!, २. ध्वजगीत, ३. ऐक भविष्याला, ४. प्रियकर हिंदुस्थान, ५. सागरा प्राण तळमळला, ६. जा झुंज, अशी काही गीते त्यांच्या विशेष आवडीची आणि प्रचाराला उपयोगी अशी आहेत. त्यापैकी एखादे गीत व्याख्यानाच्या प्रारंभी मी गात असे आणि त्याला अनुसरून बाळाराव आपले व्याख्यान रंगवीत असत. त्यांच्या व्याख्यानात प्रखर हिंदुत्वाचा विचार असे. देशाच्या प्रगतीसाठी हिंदू राष्ट्र निर्माण करणे अत्यावश्यक आहे, हे ते आग्रहाने सांगत. स्वातंत्र्यवीरांच्या चरित्राचा आणि कार्याचा गौरव आपल्या भाषणातून करत असत. बाळारावांचे मोठे कार्य म्हणजे १. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना स्वातंत्र्यवीरांचे कार्य – रत्नागिरी पर्व, २. हिंदु महासभेचे अध्यक्ष या नात्याने हिंदू संघटनाचे प्रचंड कार्य – हिंदू महासभा पर्व, ३. देशाची फाळणी होऊ नये; म्हणून केलेला जीवाचा आटापिटा – अखंड हिंदुस्थान लढा पर्व, ४. शेवटी कृतकृत्य आयुष्य – सांगता पर्व अशा चार भागांत विस्तृतपणे स्वातंत्र्यवीरांचे अप्रतिम चरित्र त्यांनी लिहिले. वीर सावरकर प्रकाशन सुरू करून असंख्य छोटी-मोठी पुस्तके स्वतः लिहिली आणि प्रकाशित केली. त्याच बरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समग्र साहित्य दोन वेळा प्रकाशित केले आणि त्याचा देशभर प्रचार केला.

रामजन्मभूमीच्या मुक्ततेचा, राम मंदिर पुन्हा प्रस्थापित करण्याचा आनंद उपभोगताना बाळाराव सावरकर यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचे ऋण आपण लक्षात घेऊन त्यांना विनम्र अभिवादन केले पाहिजे, जय श्रीराम! जय हिंदु राष्ट्र!!

(लेखिका राष्ट्रीय कीर्तनकार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त आहेत.)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.