अयोध्येतील बहुप्रतिक्षीत अशा राम मंदिराला आता मुहूर्त मिळाला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये राम मंदिर हे सर्व भाविकांना दर्शनासाठी खुले होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद दवे गिरी महाराज यांनी याबाबतची माहिती दिले आहे. त्यामुळे आता अयोध्येतील राम जन्मभूमीच्या दर्शनाचा मार्ग भाविकांसाठी मोकळा होणार आहे.
2024 मध्ये होणार प्रतिष्ठापना
फेब्रुवारी 2024 मध्ये नव्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 2024 पर्यंत मंदिराचा पहिला मजला, गर्भगृहाचे काम पूर्म करण्यात येणार असून, भाविकांच्या दर्शनासाठीची व्यवस्था पूर्ण करणार असल्याचे रामजन्मभूमी न्यासाकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे राम मंदिराचे बांधकाम सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
(हेही वाचाः जामा मशिदीखाली हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती, हिंदू महासभेचा दावा! न्यायालयात जाणार)
2025 पर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता
सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2019 मध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीवर अंतिम निर्णय दिला. त्यानंतर 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. 2025 पर्यंत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे. पण त्याआधी भाविकांना राम मंदिर दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय रामजन्मभूमी न्यासातर्फे घेण्यात आल्याचे गोविंद दवे गिरी महाराज यांनी सांगितले आहे.