भारतमातेच्या सुपुत्रास विनम्र अभिवादन!

178

जगात हिंदुस्थान सारखा दुसरा अन्य कोणताही देश नाही. हिंदुस्थानने संपूर्ण विश्वाला सभ्यता शिकवली आहे. ज्ञानाची, विज्ञानाची, सामाजिक मूल्यांची, नैतिकतेची, न्यायाची, सत्याची, संस्कृतीची थोर परंपरा असलेला आपला देश जगातला सर्वोत्तम देश आहे. म्हणूनच आपली संस्कृती सांगते दुर्लभं भारते जन्म मनुष्यं तत्र दुर्लभम अर्थात भारतामध्ये जन्माला येणे अत्यंत दुर्लभ आहे. त्यात मनुष्यजन्म प्राप्त होणे अति दुर्लभ आहे.‌

( हेही वाचा : मुंबई ते लोणावळा फक्त दीड तासात! प्रवासाचा वेळ वाचणार, तयार होणार कॉरिडॉर )

आपण अत्यंत भाग्यवान आहोत. कारण आपला जन्म भारतात झाला, हिंदुस्थानात झाला. गेल्या शतकात आपल्या देशाने सावरकर युगाचा काळ अनुभवला.‌ सावरकर कुटुंबातल्या गणेश दामोदर सावरकर, विनायक दामोदर सावरकर आणि नारायण दामोदर सावरकर या तीन बंधूंनी आपल्या रक्ताचे पाणी करून भारतमातेची सेवा केली. तिची पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्तता करण्यासाठी ब्रिटिश सत्तेला सळो की पळो करून सोडले. याच तीन सावरकर बंधूंपैकी जेष्ठ बंधू गणेश दामोदर सावरकर तथा बाबाराव सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच वाणी, लेखणी आणि प्रत्यक्ष कृतीने भारतमातेची सेवा केली. त्यांनी आपल्या देशाची उज्वल परंपरा जतन करण्याचा आणि तिला पुनश्च वैभवाच्या शिखरावर पोहोचवण्याचा भगीरथ प्रयत्न केला. या सावरकर बंधुंपैकी थोरले बंधू बाबाराव सावरकर यांचा १६ मार्च २०२३ या दिवशी ७८ वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

बाबारावांचा मूळचा पिंड हा अध्यात्मिक वृत्तीचा होता. तथापि लहान भावाच्या उत्कट राष्ट्रभक्तीने ते राष्ट्रकार्याकडे आकर्षित झाले. अध्यात्मिक मार्ग सोडून राष्ट्रकार्याकडे वळण्यासाठी त्यांना स्वतःशीच संघर्ष करावा लागला. अध्यात्मिक मार्गाचा स्वीकार केला तर आपण निश्चित मोक्ष प्राप्त करू शकतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता. वैचारिक मंथना नंतर त्यांनी राष्ट्रकार्याच्या मार्गाची निवड केली; कारण आपण एकट्यानेच मुक्ती प्राप्त करुन घेणे हे पाप आहे असे त्यांना वाटले. आपला संपूर्ण देश आणि आपली मायभूमी ही पारतंत्र्याच्या पाशात अडकलेली असताना आपण केवळ आपल्याच मुक्तीचा, आपल्याच मोक्षाचा विचार करणे हे पाप आहे. असा त्यांच्या मनाने कौल दिला. राष्ट्रकार्याकडे आपण वळलो तर भारतमातेलाही पारतंत्र्यातून मुक्त करू आणि त्याचवेळी आपल्या कोट्यावधी बांधवांनाही परदास्यातून मुक्त करू शकतो. तात्पर्य सांप्रतकाळात अाध्यात्मिक मार्गाने एकट्यानेच वाटचाल करून मोक्ष प्राप्त करण्यापेक्षा राष्ट्रकार्य करुन मायभूमीला परवशतेच्या पाशातून मुक्त करणे हे अधिक श्रेष्ठ आहे. असा विचार मनात दृढ झाल्यावर त्यांनी आपले जीवन राष्ट्रकार्यासाठी समर्पित केले.

हिंदुराष्ट्र : पूर्वी-आता-पुढे, ख्रिस्ताचे हिंदुत्व, राष्ट्र मीमांसा, वीरारत्नमंजुषा, श्रीशिवरायांची आग्र्यावरील गरुडझेप, बंदा बैरागी, ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व असे ग्रंथ बाबारावांच्या लेखणीतून साकार झाले आहेत.

बाबारावांच्या मनाच्या विशालतेची तुलना केवळ अथांग आकाशाबरोबरच करावी लागेल. आपल्या लहान भावाचे कौतुक करताना त्यांना शब्दकोशातले शब्द सुद्धा अपुरे वाटत होते. लहान भावाला (स्वातंत्र्यवीर सावरकरांना) ते गुरुस्थानी मानत होते. आपला नेता मानत होते. त्याचा मार्ग सुलभ व्हावा म्हणून बाबारावांनी स्वतःचे प्राणपणास लावले. आपल्या या कर्तृत्ववान भावाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून अखेरीच्या क्षणापर्यंत धडपड करणारा हा मोठा भाऊ अंदमानात लहान भावाला पाहताच भावविवश झाला. बाबारावांच्या मुखातून ‘तात्या, तू ही अंदमानात आलास! अरे आता आपल्या भारतमातेच्या मुक्ततेचे काय?’ बाबारावांच्या या उद्गारातच या भावंडांनी स्वतःला भारत मातेपासून कधीही वेगळे मानले नाही. स्वतंत्रतेचे स्तोत्र गाताना

तुजं साठी मरण ते जनन
तुजविण जनन ते मरण

असे स्वातंत्र्यवीर म्हणतात ते किती यथार्थ आहे याची साक्ष पटते.

सावरकर बंधूंच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा नसताना सुद्धा ब्रिटिश सरकारने या दोन्ही बंधूंचा अंदमानच्या कारागृहात अतोनात छळ केला. कवी गोविंदांच्या कविता बाबारावांनी प्रकाशित केल्या म्हणून बाबारावांना ब्रिटिश सरकारने काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली. ब्रिटिश सरकारचा न्याय पहा ज्याने कविता रचल्या त्याला कोणतीही शिक्षा झाली नाही. पण ज्याने त्या कविता प्रकाशित केल्या त्याला अंदमानची काळकोठडी!

अंदमानात बाबारावांना पाठवण्याआधीच बाबारावांचा छळ गायडर नावाच्या डेप्युटी सुप्रीटेंडंट ऑफ पोलीस या अधिकाऱ्याने केला. बाबारावांकडून त्याला अपेक्षित असलेली माहिती मिळत नाही याचा गायडरला संताप आला आणि त्याने बाबारावांना विजेचा धक्का देऊन त्यांच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. बाबारावांकडून हवी असलेली माहिती काढून घेण्यासाठी या कर्दनकाळाने बाबारावांना सुमारे पाऊण तास विजेचे धक्के दिले. बाबारावांनी हे धक्के सहन केले पण त्याला हवी असलेली कोणतीही माहिती दिली नाही. अखेरीस बाबारावांना विजेचे धक्के देऊन गायडर थकला पण बाबाराव त्याला शरण गेले नाहीत. बाबारावांविषयी त्याच्या तोंडून अवचितपणे Courageous fellow असे शब्द बाहेर पडले.
या विजेच्या धक्क्यामुळे बाबारावांचा देह गलित गात्र झाला. त्यांचे चैतन्य हरपले. मुळातच अशक्त असलेले बाबाराव अधिकच म्लान झाले. भारतमातेच्या मुक्ततेसाठी अपार कष्ट घेणारे आणि अनन्वित छळ सहन करणारे बाबाराव इच्छा शक्तीच्या बळावर अंदमानातून सदेह बाहेर आले. त्यानंतर त्यांनी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या देशभक्त क्रांतिकारकांना मार्गदर्शन केले.
गांधींच्या राजकीय धोरणांना बाबारावांनी जोरदार विरोध केला. त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अनेक वेळा त्यांच्याशी प्रतिवाद केला. बाबाराव आणि गांधी
या दोघांमधील संवाद पुढीलप्रमाणे…

बाबाराव – कारावासात जे राजकीय बंदी आहेत त्या सर्वांच्या सुटकेची मागणी आपण करावी. ती मागणी करताना अनात्याचारी आणि अत्याचार याचा भेदभाव करू नये अशी विनंती आहे.

गांधी – जी गोष्ट मागण्याने मिळेल तीच गोष्ट मागावी. ते अत्याचारी लोकांना सोडणार नाहीत, मग त्यांच्या सुटकेची मागणी करण्यात काय अर्थ?

बाबाराव – असे असेल तर इंग्रज देतील तेच मागायचे. ते जे देणार नाही ते मागायचे नाही. हेच धोरण असेल तर स्वराज्याची मागणी आपण करतो असे तुम्ही का म्हणता? ते स्वराज्य देणार नाहीत. असेच काही हक्क मागावे जे ते देतील.
(बाबारावांच्या या बोलण्यावर नंतर गांधी काही क्षण शांत बसले. नंतर म्हणाले)

गांधी – हे पहा, अत्याचारी लोकांना सोडा म्हणणे हे हीनपणाचे आहे. ते मी करणार नाही.

बाबाराव – मग स्वामी श्रद्धानंदांची हत्या करणाऱ्या हत्यारी अब्दुल रशीदसाठी हिंदू समाजाला आणि स्वामीजींच्या चिरंजीवांना भाई अब्दुल रशीदला क्षमा करा म्हणून म्हणालात तो हीनपणा नव्हता का? त्याच्यासाठी केलेला हीनपणा शस्त्राचारी राजकीय बंदीसाठी करायला आपण सिद्ध का नाही?
यावर गांधी काहीही बोलले नाहीत. बाबारावांनी नंतर खिलाफत चळवळीचा विषय काढला.

बाबाराव – खिलाफत आंदोलनाच्या वेळी मुसलमान पुढारी काबूलच्या अमिराला हिंदुस्थानवर चढाई करून येण्यास प्रोत्साहन देत होते ही गोष्ट खरी आहे का?

गांधी – काही मुसलमान पुढारी त्या प्रयत्नात होते, हे मला माहीत होते.
बाबाराव त्यांना काही प्रश्न विचारणार तेवढ्यात कोणीतरी हाक मारली आहे असे भासवत गांधी म्हणाले, ‘आता मला वेळ नाही पुढे केव्हातरी बोलू.’

विविध पातळ्यांवर राष्ट्रहितासाठी प्रयत्न करणाऱ्या बाबारावांनी हिंदुस्थानात लहान भावाने स्थापन केलेल्या अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेचा प्रचार आणि प्रसार करून ती संघटना राष्ट्रव्यापी केली.

अशा या भारतमातेच्या सुपुत्राने अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या राष्ट्राचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या ऐतिहासिक परंपरेचा अभिमान उराशी बाळगला.‌ त्याच्या उत्कर्षासाठी आपली सर्व शक्तीपणास लावली. अशा देशभक्त क्रांतिकारकांनी ज्या भूमीत जन्म घेतला त्या भूमीत आपला जन्म झाला हे आपले महद्भाग्य आहे. म्हणूनच आपण कृतज्ञतापूर्वक त्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. याचा विसर आपल्याला आणि आपल्या नंतरच्या पिढीला पडू नये यासाठीच आपण प्रयत्नशील असले पाहिजे. अशी माफक अपेक्षा व्यक्त करून या भारतपुत्राला कोटी कोटी प्रणाम!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.