Babarao Savarkar : क्रांतिकारकांच्या प्राणाचे ‘प्राण’ : बाबाराव सावरकर

बाबांचा विवाह वयाच्या १४ व्या वर्षी झाला. वैवाहिक सुख त्यांना फार उपभोगता आले नाही; कारण डोक्यात क्रांतीचे विचार सतत घोळत होते. ब्रिटीश साम्राज्य उलथून टाकण्याकरिता संघटन आवश्यक होते. येथेच बाबांचा संघटन चातुर्याचा पाया भरभक्कम रोवला गेला. पुढे बाबाराव सावरकर संघटक झाले.

231
Babarao Savarkar : क्रांतिकारकांच्या प्राणाचे 'प्राण' : बाबाराव सावरकर
वीरेंद्र देशपांडे

परकीय राजसत्ता उलथून पाडण्याचे प्रयत्न या ना त्या मार्गाने सुरु होतेच. त्यात सशस्त्र क्रांतीला जनता जनादर्नाच्या मनात रुजविण्याचे खरे श्रेय असेल, तर ते ‘सावरकर बंधूंना’ द्यावे लागेल. नि तेच योग्य नि यथार्थ ठरेल. ‘सावरकर युग’ या नावाने भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासात कायमस्वरूपी कोरले गेले. ते विनायक दामोदर नि गणेशपंत सावरकर (तात्या, बाबा) (Babarao Savarkar) या नावाने.

(हेही वाचा – Veer Savarkar : राजस्थान सरकारचा स्वागतार्ह निर्णय; पाठ्यक्रमात शिकवणार महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांचा इतिहास)

बाबाराव (Babarao Savarkar) क्रांतिकारकांच्या प्राणाचे ‘प्राण’ होते, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यांच्या क्रांतीकार्याची बीजे आसमंतात पेरली गेली होती. ब्रिटीश राज्य म्हणजे हिंदुस्थानाचे कल्याण करण्याकरिता ईश्वराची योजना अशी मवाळ नेत्यांच्या शिकवणीमुळे त्या सुमारास बाबांच्या मनात सशस्त्र क्रांतीचे स्फुल्लिंग उसळ्या मारीत होते. अशा या बाबांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी १३ जून १८७९ ला झाला. वय वर्ष ४ ते १४ पर्यंत सतत विंचूदंश होत राहिला. किमान दोनशे वेळा विंचूचा चावा त्यांनी सहन केला. ही त्यांच्या जीवनातील भविष्याची नांगीच असावी. बाबांचा सारा अंदमान, साबरमतीचा प्रवास बघता हे सहनशीलतेचे पाठ बालवयातच प्रबल नि सबलता येण्यासाठीच प्रत्यक्ष विंचूनेच दिले की काय असं वाटतं.

बाबांचा (Babarao Savarkar) विवाह वयाच्या १४ व्या वर्षी झाला. वैवाहिक सुख त्यांना फार उपभोगता आले नाही; कारण डोक्यात क्रांतीचे विचार सतत घोळत होते. ब्रिटीश साम्राज्य उलथून टाकण्याकरिता संघटन आवश्यक होते. येथेच बाबांचा संघटन चातुर्याचा पाया भरभक्कम रोवला गेला. पुढे बाबाराव सावरकर संघटक झाले. हिंदूसंघटक म्हणून बाबांची ख्याती अत्र, तत्र, सर्वत्र पसरली होती. रा.स्व. संघाचे बीज बाबांच्याच प्रेरणेतलं. बाबाराव संघाचे ‘कुलदैवत’ ठरले. तात्यारावांच्या ‘मित्रमेळा’ संघटनेमध्ये त्यांचा सारा वेळ जात होता. या संघटनेतून जनतेत देशभक्ती जागृत करण्याचे काम बाबांनी केले. बाबांचा प्रत्यक्ष ब्रिटिशांशी संबंध आला, तो १९०६ मध्ये ! बाबांनी जाहीर सभा घेण्यास असलेली बंदी मोडली. या गुन्ह्यात त्यांना अटक झाली नि १० रु दंड लावण्यात आला. काही लोकांच्या सहाय्याने बाबा सुटले. दंडही रद्द करण्यात आला. दसऱ्यानिमित्त (१७ सप्टेंबर १९०६) जंगी मिरवणूक काढली. त्यात वंदे मातरम् चा गगनभेदी उद‌घोष होऊ लागला. सभा घेतली. या कारणाने ब्रिटिश संतापले. त्यात ११ जणांवर खटला भरण्यात आला, जो पुढे ‘वंदे मातरम् खटला’ म्हणून गाजला. तात्याराव लंडनमध्ये होते. मॅझिनी चरित्राचे काही हस्तलिखित बाबारावांकडे पाठविले. गुप्तपणे बाबांनी छापण्याची व्यवस्था केली होती. याचा प्रभाव असा काही पडला की, अनंत कान्हेरे यांना जॅक्सनचा वध करण्याची प्रेरणा मिळाली. तसेच ‘१८५७च्या स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकाच्या प्रती बाबारावांकडे पाठविल्या होत्या. या ग्रंथांद्वारे बंदुका गुप्तपणे क्रांतिकारकांकडे पोहोचविल्या होत्या. या ग्रंथांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांतीची कल्पना भारतभर पोचली. त्या कारणानेच बंगाल, पंजाब, महाराष्ट्र गदर पार्टी स्थापन होऊ शकली. ते बॉम्बही तयार करण्याच्या कृतीत उणे नव्हते, ते क्रांतीकारकापर्यंत पोहोचविणे सेनापती बापट, हेमचंद्र दास, होतींलाल वर्मांना तात्यारावांनी रशियाला बॉम्ब कसे बनवायचे, याचे तंत्र नि काही कागदपत्रे, पुस्तिका बाबारावांकडे पाठवले होते. त्यातून अनेक ब्रिटिशांचे प्राण घेता आले. हा सारा उद्योग बाबांचा गुप्तपणे चालत असे. ब्रिटिशांची वक्रदृष्टी बाबांवर राहायची. त्यांना अटक करण्याच्या संधीची ते वाट बघू लागले. ११ जून १९०८ ला शिवरामपंत परांजपे यांना अटक झाली त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांच्या वक्तृत्वाने अनेकांना वेड लावले होते. अनेक जण संतापले. त्यात एक खोजा जमातीचा होता. त्याचा नि पोलिसांचा खूप वाद सुरु असता बाबांचे रक्त उसळले. बाबाराव मध्यस्थी करु लागले नि पोलिसांची चकमक सुरू झाली नि त्याने बाबारावांना पोलिस ठाणे दाखविले. ठाण्यातही बाबांची चकमक सुरु होती. तेव्हा वरिष्ठ अधिकारी बाबांकडे आले नि म्हणाले. तुझे नाव काय… बाबांनी सांगितले बाबा सावरकर हे सांगताच तो वरिष्ठ पोलिस अधिकारी आनंदून गेला, कारण बऱ्याच दिवसांपासून तो अधिकारी बाबांना पकडण्याच्या संधीची वाट बघत होता. क्षणाचा विलंब न करिता बाबारावांची झडती घेतली. तेव्हा बाबांजवळ रशियन क्रांतीसंबंधीचे पत्रक सापडले. त्या पत्राच्या आधारे बाबांना शिक्षा झाली. त्यांनी ती ठाणे आणि नाशिक कारागृहात भोगली.

(हेही वाचा – Veer Savarkar : शिवाजी पार्क सभेत बोला; पण वीर सावरकरांचा अवमान कराल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही; मनसेचा राहुल गांधींना इशारा)

क्रांतिकारकांच्या अनेक गुप्त उद्योगांत बाबारावांचा (Babarao Savarkar) हात आहे आणि मार्गदर्शनही मिळत आहे, हे गुप्तचरांना समजले होते. बाबा शिस्तबध्दता, संयम वैगरेने वागत. १९०९ मध्ये बाबारावांनी कवी गोविंद (आबा दरेकर) यांच्या काही खळबळजनक क्रांतिकारी कविता प्रसिद्ध केल्या होत्या. त्या कवितेचा मतितार्थ असा होता, कुठल्याही देशाला सशस्त्र क्रांतीवाचून स्वातंत्र्य मिळाले नाही. मग हिंदुस्थान कसा निःशस्त्र राहून स्वातंत्र्य प्राप्त करणार? ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले, असा भूतकालीन सिद्धांत जाणा’ हे ते काव्य होते. तशी कृती फार लहान होती. परंतु पुढील धोका टाळण्यासाठी ब्रिटिश सरकारने राईचा पर्वत केला नि बाबारावांना काळ्या पाण्याची जन्मठेपेची शिक्षा दिली. बाबांचे वय त्या वेळी २९-३० होते. ८ जून १९०९ मध्ये बाबाराव अंदमानात पोहचले. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याने बाबारांवानाही शिक्षा दिली होती. याचा प्रतिशोध अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे, अण्णा कर्वे यांनी घेतला. यात अनेक (३९) तरुण पकडले गेले. हा खटला ‘नाशिक खटला’ म्हणून प्रसिद्ध पावला. यात बाबारावांचे धाकटे बंधू नारायणरावही सापडले होते. तिघांनाही फाशी झाली. (कान्हेरे, देशपांडे, कर्वे) लंडनमध्ये मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायली याला यमसदनी पाठविले. अनेक क्रांतिकारकांना अंदमानात पाठविण्यामागे कर्झन वायली होता.

अंदमान जेलमध्ये बाबारावांना (Babarao Savarkar) ज्या काही यातना दिल्या गेल्या, त्या लिहिताना, वाचताना अंगावर शहारे येतात. अतिशय क्रूर वागणूक बाबारावांना देण्यात आली. कष्ट, वेदना अशा होत्या की, वेदनेला कीव यावी. अतिभयंकर, तरीपण बाबांच्या मनातील क्रांतीभावना तसूभर उणी झाली नाही. संघटन चातुर्य नि अन्यायाचा प्रतिकार नसानसांत भिनला होता. तेथे त्यांनी राजकीय कैद्यांना संघटित केले. चांगले अन्न मिळावे; म्हणून उपोषण, असहकार याने संघटित लढा दिला. परिणाम असा झाला की, बाबांना शारीरिक कठोर शिक्षा भोगाव्या लागल्या, बाबांनी राजकीय कैद्यांमध्ये विचारांची देवाण-घेवाण करण्याकरता नवीनच पद्धत सुरू केली. कैद्यांच्या हातकड्या कोठडीच्या गजावर विशिष्ट पद्धतीने आपटून कैदी आपले विचार नि संकेत कळवीत नि नवीन राजबंद्यांना कारागृहाच्या जीवनाची कल्पना देत.

बाबाराव (Babarao Savarkar) अंदमानात शिक्षा भोगत असतानाच त्यांचे भाऊ तात्याराव सावरकरही अंदमानात पोहोचले. त्यांना ५० वर्षांची शिक्षा झाली. तरी ते एकमेकांशी भेटू शकत नव्हते. एकदाच दूरून बाबारावांना तात्यांचे दर्शन झाले नि बाबा मनातच पुटपुटले ‘तात्या तू येथे कसा?’ आता आपल्या ‘अभिनव भारता’चे काय? ‘अभिनव भारत’ ही सशस्त्र क्रांतिकारक संघटना तात्याराव सावरकरांनी स्थापन केली होती. ६ एप्रिल १९२१ ला १३ वर्षानंतर दोन्ही सावरकर बंधू अंदमानच्या कारागृहातून सुटले. बाबारावांना गुजराथ येथील साबरमती कारागृहात ठेवले, तर तात्यारावांना रत्नागिरीत. कठोर शिक्षा, यातना, कष्ट याने बाबारावांची प्रकृती अतिशय क्षीण झाली होती. त्यांची भावाप्रमाणे सेवा केली ती आचार्य भन्साळी यांनी. प्रकृतीने बाबाराव अतिशय जर्जर झाले होते. त्यांची कारागृहातून सुटका व्हावी, याकरिता त्यांचे धाकटे भाऊ नारायणराव यांनी बऱ्याच मोठ्या लोकांच्या भेटी घेवून त्यांच्या सुटकेकरिता प्रयत्न केला. परंतु अपयशी ठरले. ज्या वेळी सिव्हिल सर्जन म्हणाले बाबाराव आता काही तासांचेच सोबती आहेत, तेव्हा ब्रिटीश सरकारने मोठा उदारपणा दाखवून अखेर त्यांची बिनशर्त सुटका केली.

स्वातंत्र्यसैनिक बाबारावांच्या (Babarao Savarkar) आजाराचा वृत्तांत सर्वत्र पसरला. एका क्रांतिकारकाची अशी दारूण अवस्था केल्याने ब्रिटिशांबाबत संताप नि चीड सर्वत्र पसरली. बाबांचे प्राण वाचावे; म्हणून अनेक मोठी माणसे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. सर्वांशी बाबारावांचे संबंध स्नेहाचे नि आदराचे होते. त्यांच्या त्यागाची सर्वांना कल्पना होती. बनारसचे सुप्रसिद्ध वैद्यरत्न त्र्यंबक शास्त्री यांच्याकडून औषधोपचार मागवण्याची व्यवस्था पंडित मदनमोहन मालविय यांनी केली. हळूवार बाबांच्या प्रकृतीला आराम पडत गेला. बाबांचा मुक्काम तीन महिने तेथेच होता. त्या सुमारास बाबारावांचा सल्ला, मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक थोर नेते, पुढारी येत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, क्रांतीकारक सचिंद्रनाथ संन्याल, रामानंद चटर्जी. पं. मालवीयजी, लोकनायक बापूजी अणे, डॉ. हेडगेवार, गुरुजी गोळवलकर, हुतात्मा राजगुरु अशी सारी मंडळी होती, हे वर्ष होते १९३१ चे.

(हेही वाचा – Veer Savarkar : पवई येथे रणजित सावरकर आणि आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते सावरकर स्मारकाचे लोकार्पण)

क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद वीरमरण पत्करण्याच्या दोन दिवस अगोदर आझाद नि बाबारावांच्या (Babarao Savarkar) चर्चा झाल्या होत्या. हितगुज झाले होते. आझाद हुतात्मा झाल्यानंतर दिवसभर ढसाढसा रडणारे बाबाराव काशीच्या घरात श्री. दामले यांनी बघितले. बाबांच्या प्रयत्नाने उत्तर प्रदेशप्रमाणे, संघाचा विस्तार दिल्ली, पंजाब नि बिहारमध्ये झाला. बाबारावांनी काही महत्त्वाची पुस्तके लिहिली. त्यात प्रामुख्याने शिवरायांची आग्र्यावर गरूड झेप, राष्ट्र मीमांसा, ख्रिस्ताचे हिन्दुत्व अर्थात ख्रिस्त परिचय, वीररत्न मंजुषा आदी होते. ते भाषा शुध्दीचे प्रवर्तक होते. हिंदू संघटनाकरिता बाबाराव खूप झटले. त्यांनी तरुण हिंदू महासभा रा. स्व. संघात विलीन केली. संघाचा पहिला ध्वज बाबारावांच्या हातून डॉ. हेडगेवारांनी करवून घेतला. तसेच प्रतिज्ञाही बाबांकडून लिहून घेतली. संघावर बाबारावांचा जीव होता. डॉ. हेडगेवार नि बाबारांवानी विविध गावं, शहरे, नगर येथे दौरे केले. बाबाराव क्रांतीवीर वा. ब. गोगटेंचे (हॉरसनवर गोळी झाडणारे) मार्गदर्शक होते. बाबारावांची देशसेवा ६७ वर्षे, सातत्याने देशहितासाठी प्राणपणाने झटणारे बाबारावांनी १६ मार्च १९४५ ला सांगली येथे अखेरचा श्वास घेतला. त्या वेळी खऱ्या अर्थाने त्यांना विश्रांती लाभली.

स्वातंत्र्यसंग्रामातील काही व्यक्ती ज्ञात आहेत. परंतु बाबारावांसारखे असे कितीतरी क्रांतीकारक आहेत की ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामासाठी त्याग केला, कष्ट केले, घरदार सोडले, संसार उध्वस्त करून स्वातंत्र्य चळवळीचा पाया भक्कमपणे रोवला. अशा अनेकांची क्रांतीकार्ये जगाला तर सोडाच, पण हिंदुस्थानच्या लोकांना देखील माहीत नाही. काही राजकारण्यांनी आपले महत्त्व उणे होते कि काय, या विचाराने जातीवंत क्रांतिकारकांचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला. स्वार्थ, पद, पैसा, कष्ट न करता सारं काही मिळावं, असले राजकारणी. देशहिताची पर्वा न करता समाज निर्माण करण्याचे स्वप्न बघत असेल, तर हे स्वतंत्र भारताचे दुर्भाग्य म्हणता येईल. देश अधिक मोठा आहे ! देश हाच देव !!
क्रांतीवीर बाबारावांसारख्या (Babarao Savarkar) महान आत्म्यास मनःपूवर्क वंदन!
शतः शतः प्रणाम !!

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.