शब्दांत मांडता न येणारे दुःख! पंतप्रधानांकडून बाबासाहेबांना श्रद्धांजली

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन बाबासाहेबांच्या भेटीदरम्यानचा फोटो ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

पंतप्रधान मोदी यांनी बाबासाहेबांच्या निधनामुळे कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाल्याचे म्हटले आहे. शब्दांमध्ये मांडता येणार नाही असे दु:ख झाले आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या निधनामुळे इतिहास आणि संस्कृतिक क्षेत्रामध्ये कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेले इतर कामही कायमच स्मरणात राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले. शिवशाहीर पुरंदरे हे यांनी २९ जुलै रोजी वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण केले. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती दर्शवली होती.

(हेही वाचा : बाबासाहेबांचे ‘ते’ स्वप्न कधी साकार होणार?)

वैयक्तिक स्तरावर दुःखदायक घटना – राज्यपाल

महाराष्ट्रात येऊन शिवशाहिर बाबासाहेब यांचा घनिष्ट परिचय होणे ही आपली जीवनातली एक मोठी उपलब्धी आहे, असे आपण मानतो. त्यामुळे त्यांचे निधन हे आपल्याकरिता वैयक्तिक स्तरावर देखील दुःखदायक आहे. या दुःखद प्रसंगी आपल्या तीव्र शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना तसेच चाहत्यांना कळवतो, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्रद्धांजली वाहिली.

शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक! मुख्यमंत्री   

शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

तर एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्विट केले.

(हेही वाचा : शिवशाहिरांचे निर्वाण)

एक अध्याय पडद्याआड! – अजित पवार

ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहताना ‘तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकायला आणि वाचायला मिळाले, हे आमच्या पिढीचे भाग्यच! नुकतेच त्यांचे 100 व्या वर्षांत पदार्पण झाले, तेव्हा त्या सोहळ्याला आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याचा योग आला आणि आज ते आपल्यात नाहीत. विश्वासच बसत नाही. बालपणापासून त्यांनी शिवचरित्र आणि शिवशौर्य सांगून बलशाली समाज घडविण्यात योगदान दिले. एक अमोघ व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक त्यांच्या जाण्याने हरपला आहे. ‘राजा शिवछत्रपती’सारखा चरित्रात्मक ग्रंथ,‘जाणता राजा’ महानाट्य हा त्यांनी आपल्याला दिलेला फार मोठा आणि अमूल्य ठेवा!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here