पोलिसांच्या सुविधेसाठी देण्यात आलेले तंबू बनले अडचणीचे

165

नाकाबंदी असो अथवा बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचा ऊन-पाऊस यापासून बचाव व्हावा या उद्देशातून मुंबई पोलिसांना एका सामाजिक संस्थेकडून देण्यात आलेल्या तंबूची देखभाल होत नसल्यामुळे त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी हे तंबू वापरात नसल्यामुळे उगाचच रस्त्यावर या तंबूची अडचण होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

मुंबईत प्रत्येक पोलीस ठाण्याला दररोज आपल्या हद्दीत दिवसभरात दोन ते तीन वेळा नाकाबंदीसाठी भर उन्हात पावसाळ्यात थांबावे लागते, त्यात बंदोबस्त असल्यामुळे महिला पोलीस अंमलदार यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पोलिसांची ही अडचण दूर करण्यासाठी ‘रिलायंस फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेने वर्षभरापूर्वी मुंबईत प्रत्येक पोलीस ठाण्याला नाकाबंदीच्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचे तंबू दिले आहे. या तंबूमध्ये पोलिसांना कपडे बदलण्यासाठी आणि आरामासाठी या तंबू मध्ये दोन लहान खोल्या काढण्यात आलेल्या आहेत.

( हेही वाचा : उत्तर प्रदेशात पुन्हा मोदी-योगीच! अन्य राज्यांचा काय म्हणतो एक्झिट पोल? )

तंबूची दूरवस्था

‘रिलायंस फाउंडेशन’ने मुंबई पोलिसांना एकूण १०० तंबू दिले आहे. मात्र या तंबूची व्यवस्थित देखभाल होत नसल्यामुळे या तंबूची दूरवस्था झाली आहे. या दूरवस्थेमुळे अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत या तंबूचा वापर बंद झाला आहे. या तंबूचा वापर होत नसल्यामुळे रस्त्यावर त्याची अडचण होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पूर्व उपनगरातील एका पोलीस अंमलदाराने सांगितले की, उभारलेल्या तंबूमुळे आम्हाला रहदारीवर लक्ष ठेवण्यात तसेच चुकीच्या वाहनचालकांना रोखण्यात मदत झाली. पण जसजसा वेळ निघून गेला तसतसा मुसळधार पावसामुळे तंबूंची अवस्था बिकट झाली. आम्ही आमच्या वरिष्ठांना त्यांच्याकडे लक्ष घालण्याची विनंती केली, परंतु कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. आज तंबू दयनीय स्थितीत आहेत, असे या पोलीस अमलदारांचे म्हणणे आहे. “माझ्यासारख्या हवालदारासाठी हे दिलासादायक होते कारण आम्ही पश्चिम महामार्गावर नाकाबंदी करीत असताना तंबूमुळे माझ्यासारखे अनेकजण तासनतास उभे राहू शकले, आम्ही पाणी साठवून ठेवू शकतो आणि स्वतःचे सामान ठेवू शकतो, परंतु आता या तंबूची अवस्था इतकी वाईट झाली आहे की आत बसणे अशक्य आहे,” असे पश्चिम विभागातील एका हवालदाराने सांगितले.

देखरेख करण्यासाठी निधी दिला जात नाही

तंबूंची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी हिंदुस्थान पोस्टने अनेक ठिकाणी तंबूला भेटी दिल्या. त्यापैकी नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तंबूचा दरवाजा तुटलेला आढळून आला. ते दरवाजे बांधून ठेवण्यासाठी तारांनी बांधले होते. नियमित साफसफाई न केल्याने ते अस्वच्छ झाले आहेत. “उष्णतेमध्ये आणि पावसाळ्यात आम्हाला खूप मदत झाली. पण त्याची अवस्था आता तुम्ही पाहू शकता. ते कोसळण्याची भीती असल्याने आम्ही आत बसत नाही, ” असे एका पोलिसाने सांगितले.

हिंदुस्थान पोस्टच्या प्रतिनिधीने माहीम या अतिमहत्त्वाच्या मार्गावरील महत्त्वाचे जंक्शन या ठिकाणी ठोकण्यात आलेल्या तंबूजवळ भेट दिली असता या तंबूमुळे रस्त्याचे एकंदर स्वरूपच खराब होत नाही तर दादरकडे जाणारी महत्त्वाची लेनही अडवली जाते. काही महिने आम्ही तंबूच्या आत कोणालाही पाहिले नाही. त्यांनी रस्ता का अडवला आहे याची कल्पना नाही,” असे सांगत एका टॅक्सी चालकाने आश्चर्य व्यक्त केले. “या तंबूमुळे रात्रीच्या वेळी एखादा भीषण अपघात होऊ शकतो. ते लवकरात लवकर काढून टाकावे.” असे टॅक्सी चालकाने प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

तंबूच्या देखरेखीबाबत आम्ही एका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची भेट घेतली असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “या तंबूची देखरेख करण्यासाठी आम्हाला कुठलाही निधी मिळत नाही. तंबू महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. अगदी विजेसाठी, आम्हाला जवळच्या दुकानातून विजेचे कनेक्शन घ्यावे लागले आणि महामार्गावर ते अवघड आहे, ”असे या वरिष्ठ निरीक्षकाने नाव छापण्याच्या अटीवर सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.