राज्याच्या किनारपट्टीला विणीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी भेट देणा-या पाच मादी ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटलाईट टॅगिंग करुन त्यांच्या समुद्रभ्रमंतीचा मार्ग शोधण्याच्या वनविभागाच्या प्रयत्नाला पुन्हा ग्रहण लागले. पाच मादी कासवांपैकी प्रथमा या मादी कासवाशी शास्त्रज्ञांचा संपर्क तुटला आहे. प्रथमा ही संपर्क तुटलेली दुसरी मादी ऑलिव्ह रिडले कासव ठरल्याने या उपक्रमाबाबत रुची निर्माण झालेल्या अनेक कासवप्रेमींचा हिरमोड झाला आहे.
मान्सूनची चाहूल लागताच रिडले कासव किनारपट्टीवर
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सॅटलाईट टॅगिंग करुन ऑलिव्ह रिडले कासवांच्या समुद्रभ्रमंतीचा मार्ग शोधण्यासाठी प्रथमाची निवड सर्वात प्रथम झाली होती. सहा महिन्यांपूर्वी २५ जानेवारी रोजी वेळास येथून तिला भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ आर सुरेशकुमार व वनविभागाच्या कांदळवन कक्षांच्या टीमने कासवप्रेमींसह तिच्या पाठीवर सॅटलाईट टॅगिंग बसवले होते. या प्रयोगाचा पहिला मान मिळवणा-या मादी कासवाला प्रथमा असे नाव मिळाले. सहा महिन्यात मुंबई पार करत प्रथमा अगदी गुजरातपर्यंत जाऊन परतली होती. महिनाभर गुजरातच्या समुद्रात भ्रमंती केल्यानंतर तिने पुन्हा राज्यातील समुद्राच्या दिशेने दक्षिण दिशेकडे प्रवास सुरु केला. प्रथमासह लागोपाठ सॅटलाईट टॅगिंग केलेल्या मादी ऑलिव्ह रिडले कासव मान्सूच्या आगमनाची चाहूल लागताच किनारपट्टीजवळ येऊ लागल्या.
(हेही वाचा – SBI ग्राहकांना दिलासा! Electric Vehicle खरेदी करताय? मग ही बातमी वाचा)
राज्यात परतलेल्या प्रथमाकडून २४ मे रोजी शेवटचे सिग्नल मिळाले. ही माहिती २९ मे रोजी प्रतिमेसह आम्ही दिली, अशी माहिती कांदळवन कक्षाचे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे यांनी दिली. त्यानंतरही तिच्याकडून सिग्नल्स मिळत नव्हते. इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही प्रथमाकडून सिग्नल्स येणे बंद झाल्याने तिचे सध्याचे समुद्रातील ठिकाणाची माहिती मिळत नसल्याचे जाहीर केले.
प्रथमाच्या सिग्नल मिळत नसल्याने तांत्रिक बिघाडाची शक्यता
जंगलात रेडिओ कॉलरिंग केलेल्या वाघाकडून संपर्क येणे बंद झाल्यास प्रत्यक्षात शेवटचे सिग्नल येणा-या ठिकाणाला भेट देणे वनाधिका-यांना, शास्त्रज्ञांना शक्य होते. समुद्रातील सागरी जीवाकडून मिळालेल्या शेवटच्या सिग्नलच्या ठिकाणाला भेटी देत जलचराची माहिती मिळणे जवळपास अशक्यप्राय असते. प्रथमाच्याबाबत सिग्नल मिळत नसल्याने तांत्रिक बिघाड झाल्याची दाट शक्यता कर्वे यांनी व्यक्त केली. यााधी प्रथमापाठोपाठ सॅटलाईट टॅगिंग झालेल्या लक्ष्मी या मादी कासवाकडून महिन्याभरातच सिग्नल येणे बंद झाले होते. तिचा नैसर्गिक मृत्यू किंवा सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाड ही दोन्ही कारणे मांडली गेली. परंतु प्रथमाच्याबाबतही तांत्रिक कारणामुळेच सिग्नल बिघाड झाल्याची दाट शक्यता कर्वे यांनी व्यक्त केली. प्रथमाने २५ जानेवारीपासून महाराष्ट्र ते गुजरातच्या समुद्रातील किनारपट्टीच्या प्रवासात आतापर्यंत २ हजार ७०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. प्रथमाकडून शेवटचा सिग्नल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथील समुद्रातून मिळाला.