चेंबूरच्या कस्तुरबा सोसायटीत राहणाऱ्या बडिया कुटुंबीयांचं हक्काचं घर असणारी इमारत धोकादायक ठरली होती. त्यामुळे आठवडाभरापूर्वीच नाईकनगरमधील इमारतीत बडिया कुटुंबीय राहण्यासाठी आले होते. ते आधी रहात असलेल्या बिल्डरने इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी खोली रिकामी करा, असे सांगितल्यामुळे त्यांनी ती जागा सोडून येथे राहण्याचा निर्णय घेतला, पण सोमवार रात्रीच्या दुर्घटनेत घरातल्या कर्त्या पुरुषाला जीव गमवावा लागला.
काय घडला प्रकार?
रमेश बडिया (50) पत्नी देवकी (42) आणि 17 वर्षांचा मुलगा प्रीतला घेऊन कुर्ला नेहरूनगरमधील इमारतीत आठवड्याभरपूर्वीच राहायला आले होते. व्यवसायाने कार्पेन्टर असलेल्या रमेश यांना इमारतीतील भाड्याचे घर आठ दहा हजारांमध्ये उपलब्ध झाले. घराचे बजेट परवडत असल्याने रमेश पत्नी आणि मुलासह सहा दिवसांपूर्वीच नव्या घरात आले. सोमवारी रात्री इमारतीला कंपने जाणवू लागली तेव्हा पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या बडिया कुटुंबीयांनी तातडीने घरातून पळ काढला. पायऱ्या उतरणाऱ्या रमेश यांच्यासह पूर्ण पायऱ्यांकडचा भाग कोसळला. पाठून येणाऱ्या प्रीत आणि पत्नी ढीगाऱ्याखाली अडकले.
…आणि ढिगाऱ्याखाली शोध लागला
मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास प्रीत आणि देवकी यांनी मदतीसाठी आवाज देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आवाजाला प्रतिसाद दिला. बारा तास ढीगऱ्याखाली दबलेल्या प्रीत आणि देवकी यांच्या मदतीचा आवाज कोणापर्यंतही पोहोचत नव्हता. हळूहळू ढिगारे उपसू लागल्याचा आवाज त्यांच्या कानावर पोहोचला, कोणी आहे का, या प्रश्नावर दोघांची आर्त हाक पोहोचत नव्हती. अखेर दोघांनी ढिगाऱ्यातून ग्लास शोधून काढला आणि जोरजोराने वाजवायला सुरुवात केली, त्यामुळे त्यांचा शोध लागला. दोघांना बाहेर काढून तातडीने राजावाडी रुग्णालयात आणले गेले. दोघे सुखरूप असल्याचे पाहून कोसळलेल्या इमारतीबाहेर रात्रीपासून उभे असलेल्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.
रुग्णालयाबाहेरच थांबलेल्या नातेवाईकांना दुपारी तीन वाजता रुग्णवाहिकेतून बाहेर आणला जाणारा रमेश बडियायांचा मृतदेह दिसला. इतक्या तासांपासून मनाच्या कोपऱ्यात घर करून बसलेली भीती खरी ठरली होती. अश्रुंचा बांध फुटला… आपला नवरा, बाबा कुठे आहेत हा प्रश्न विचारणाऱ्या देवकी आणि प्रीतला काय उत्तर द्यायचे या प्रश्नाचे उत्तर बडिया कुटुंबीय शोधत होते.
Join Our WhatsApp Community