बदलापूरमधील सर्व रिक्षा चालकांनी बेमुदत संप पुकारला असून आज, सोमवारी सलग तिसऱ्या दिवशीही हा संप सुरू आहे. रिक्षा स्टँडच्या मागणीसाठी रिक्षा चालकांनी साखळी उपोषण सुद्धा सुरू केले आहे. त्यामुळे बदलापूरमधील रिक्षा सेवा पूर्ण ठप्प झाली असून यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. रिक्षा चालकांच्या संपामुळे रिक्षा वाहतूक बंद, एसटीची कोणतीही सुविधा नाही त्यामुळे प्रवाशांना पायी स्टेशनवर जावं लागत आहे, यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
(हेही वाचा – बिहारच्या वैशालीमध्ये भीषण अपघात, 30 जणांना ट्रकने चिरडले, 12 जणांचा मृत्यू)
बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रिक्षा स्टँडवर शुक्रवारी बदलापूर पालिकेने कारवाई केली. यावेळी पालिकेकडून रिक्षा स्टँड जमीनदोस्त करण्यात आले. रेल्वेच्या होम प्लॅटफॉर्मसाठी आणि पादचारी पुलासाठी ही जागा लागणार असल्याने हे रिक्षा स्टँड तोडण्यात आले होते. मात्र हे रिक्षा स्टँड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला हलविण्यात आल्यानंतर ते तोडण्यात येणार होते. त्यासाठी स्वतः बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी रिक्षा चालकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हे रिक्षा स्टँड स्थलांतर करण्याला सहमती दर्शविली होती. परंतु कोणतीही पर्यायी जागा देण्यापूर्वी पालिकेने अनधिकृत गाळ्यांवर केलेल्या कारवाईसोबत रिक्षा स्टँडवर सुद्धा कारवाई केली. त्यामुळे संताप व्यक्त करत रिक्षा चालकांनी हा बेमुदत संप पुकारला होता.
रिक्षा आणि टॅक्सी सेवा संपूर्णपणे ठप्प
या संपाचा आजचा तिसरा दिवस असून यासोबत रिक्षाचालकांनी साखळी उपोषण सुद्धा सुरू केले आहे. रिक्षा चालकांच्या या संपामध्ये बदलापूर शहरातील ४ हजार रिक्षाचालक सहभागी झाले आहेत. यामध्ये बदलापूर पश्चिमेकडील ४५, पूर्वेकडील ३० स्टँडवरील रिक्षा चालकांचा समावेश आहे. यासह बारवी डॅम आणि मुरबाडकडे जाणाऱ्या काळा-पिवळ्या टॅक्सी चालकांनी सुद्धा या संपामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे बदलापूर शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागात जाणारी रिक्षा आणि टॅक्सी सेवा संपूर्णपणे ठप्प झाली आहे.
Join Our WhatsApp Community