शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर रोजी ९ वा स्मृतिदिन. आज शिवसेना सत्तेत आहे, बाळासाहेबांचे सुपुत्र मुख्यमंत्री आहे, तरीही बाळासाहेब पाहिजे होते, असे दररोज राज्यातील एक तरी व्यक्ती बोलत असेल, ही वस्तुस्थिती आहे. यामागील कारण भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय चपखल शब्दांत सांगितले. भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पत्रकार परिषद घेताना मुनगंटीवार म्हणाले, बाळासाहेब २४ कॅरेट सोनं होते. शिवसेनेला हे झोंबले पण त्यांनी त्या वाक्याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. शिवसेनेची सोन्याची झळाळी का कमी झाली, याचे चिंतन करण्याची गरज आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी तमाम शिवसैनिक शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर चाफ्याची फुले अर्पण करतील, तेव्हा मनोमन तोही बाळासाहेबांना म्हणेल, साहेब सेनेची ती झळाळी दिसत नाही, आमचं काही चुकतंय का?
…पण हिंदुत्वाची दोरी तुटू दिली नाही!
खरंतर बाळासाहेब यांची कारकीर्द पाहता ते शिवसेना पक्षापुरते सीमित राहिले नाही, ते तमाम हिंदूंचे नेते बनले होते, त्यामुळे उद्या बाळासाहेबांची जेवढी शिवसैनिक आठवण काढेल त्यापेक्षा काकणभर जास्त हिंदुत्वावर श्रद्धा ठेवणारे काढतील हे नक्की. त्याला कारणही समर्पक आहे. जनसंघाचे भाजपमध्ये रूपांतर झाले. पुढे बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार आत्मसात केला. त्यानंतर त्यांनी पहिले काम केले. हिंदुत्वाच्या दोन शक्ती आधी एकत्र आणल्या. अर्थात भाजपसोबत युती केली. म्हणून बाळासाहेबांना दूरदृष्टी असलेला नेता म्हणतात. या देशात हिंदू संख्येने जास्त असले तरी राजकीय चष्म्यातून त्यांना काही महत्व असल्याचे त्यांना दिसले नाही. काँग्रेसच्या राजवटीत हिंदूंचे मूलभूत हक्क अबाधित राखायचे असतील तर त्यांची राजकीय पातळीवर विभागणी न होता त्यांचे संघटन होणे नितांत गरजेचे आहे, बाळासाहेबांच्या या विचाराने क्षणात परिवर्तन घडले आणि केंद्रात भाजपप्रणीत आणि राज्यात शिवसेना – भाजप युतीची सत्ता आली. हा प्रयोग बाळासाहेबांच्या संकल्पनेमुळे वास्तवात आला. पुढे अनेक मतभेद झाले पण हिंदुत्वाची दोरी तुटू दिली नाही, त्यामुळेच काँग्रेसला कायम याची अडचण वाटत आली…म्हणून बाळासाहेब २४ कॅरेट सोनं होते हे नेहमी सच्च्या शिवसैनिकाला मनोमनी वाटतं.
…म्हणून बाळासाहेब रोज आठवतात
बाळासाहेब गेल्यानंतर अवघ्या एक वर्षात हिंदुत्वाची दोरी तुटली. बाळासाहेबांच्या हयातीत २५ वर्षे काँग्रेसला आणि नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जे जमले नाही ते बाळासाहेब गेल्यावर सहज साध्य झाले. याला कारणे अनेक असतील, छोटा भाऊ आणि मोठा भाऊ म्हणून निर्माण झालेली स्पर्धा पुढे सत्तेच्या हव्यासासाठी इतकी पुढे गेली की शरद पवार यांनी संधी साधली आणि हिंदुत्वाची ही दोरी अलगत कापली. युतीच्या काळात २५ वर्षांत शिवसेना सडली, असे म्हणण्या इतपत शिवसेनेच्या नेतृत्वाची मजल गेली. त्यांना हे ठावूक नव्हते की, असे म्हणून ते बाळासाहेबांना अप्रत्यक्षपणे दूषणे देत आहेत. आता तुटलेली हिंदुत्वाची दोरी कुरतडून इतकी कमी झाली आहे की, कुणी इच्छा केली तरी दोरीची दोन टोके एकत्र येणार नाहीत. म्हणून बाळासाहेब गेल्यावरही ९ वर्षानंतरही बाळासाहेब दररोज राज्यातील देशातील एका तरी हिंदूला आठवतात, तितक्याच प्रकर्षाने जाणवतात.
युतीच्या २५ वर्षांची उजळणी होईल का?
एखादी व्यक्ती निघून गेली की हळूहळू तिचे स्मरण कमी होवू लागते, तिचे अस्तित्व नाहीसे होत जाते, मात्र बाळासाहेबांच्या बाबतीत असे का वाटत नाही? दर दिवशी त्यांची आठवण घट्ट होत आहे, याचे कारण सद्यस्थितीत त्यांची उणीव भासत आहे. ही उणीव भासत राहणे हे शिवसेनेच्या नेतृत्वाचे अपयश नव्हे का? आता हे अपयश काय आहे? हे समजण्या इतके सेनेचे नेतृत्व बिलकुल अपरिपक्व नाही. युतीच्या कालखंडातील बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील २५ वर्षांत युतीमधील झालेले मतभेद आणि त्यातून काढलेले मार्ग हा एक अभ्यास म्हणून जरी सेना भाजपच्या नेत्यांनी उजळणी केली असती तरी मागील ९ वर्षांत निर्माण झालेल्या प्रश्नांची त्या-त्या वेळी उत्तरे मिळाली असती, पण दुर्दैवाने ते घडले नाही. बाळासाहेबांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्ताने तरी याची उजळणी करण्याची बुध्दी झाली तरी खूप होईल.
Join Our WhatsApp Community