हे आहेत मुंबईतील पहिले मराठी प्राध्यापक, इंग्रजांनीही केला होता सन्मान

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आजकाल असंख्य मराठी प्राध्यापक आणि शिक्षक विद्यादानाचं काम करत आहेत. अनेक आतंरराष्ट्रीय दर्जाच्या महाविद्यालयांमध्ये सुद्धा मराठी प्राध्यापक आपला ठसा उमटवताना दिसतात. पण ज्यावेळी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता त्यावेळी देशात शाळा आणि कॉलेजं ही दुर्मिळंच होती. आणि त्यातल्या त्यात इंग्रजी महाविद्यालयांमध्ये मराठी प्राध्यापक असणे ही तर त्याहून दुर्मिळ गोष्ट.

पण इंग्रजांच्या काळात सुद्धा एका मराठी माणसाने मुंबईतील आणि कदाचित संपूर्ण देशातील पहिले मराठी प्राध्यापक होण्याचा मान मिळवला होता. इतकंच नाही तर त्यांना देशातील मराठी वृत्तपत्रांचे जनक म्हणूनही ओळखले जाते. या अद्वितीय व्यक्तिमत्वाचं नाव आहे बाळशास्त्री जांभेकर.

Bombay Native Education Societyचे सचिव

बाळशास्त्रींचा जन्म 1812 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोभुर्ले या गावी झाला. बाळशास्त्रींचा लहानपणापासूनच शिक्षणाकडे ओढा होता. समाजात वैचारिक क्रांती घडवून आणायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे त्यांना लहान वयातच कळले होते. विद्यार्थी असतानाच बाळशास्त्रींनी शाळेत गणित विषयाचे शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर लॉर्ड एल्फिन्स्टन आणि तत्कालीन मुंबईचे अनभिषिक्त सम्राट नाना शंकरशेठ यांनी स्थापन केलेल्या Bombay Native Education Society चे सचिवपद बाळशास्त्री जांभेकरांनी भूषविले.

पहिले मराठी प्राध्यापक

मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या स्मरणार्थ 1834 साली मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना झाली. या कॉलेजमध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. एल्फिन्स्टन कॉलेजातील ते पहिले मराठी प्राध्यापक होते. या कॉलेजात ते गणित, भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र हे विषय शिकवत. मुख्य म्हणजे याच कॉलेजात शिकणारे दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे समाजसुधारक बाळशास्त्रींचे विद्यार्थी होते.

एल्फिन्स्टन कॉलेज

इंग्रज सरकारकडून सन्मान

शिक्षण क्षेत्रातील दबदब्यामुळे बाळशास्त्रींची शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक आणि मुंबईतील मराठी शाळांचे इन्स्पेक्टर म्हणून इंग्रज सरकराने नियुक्ती केली होती. इतकंच नाही तर शिक्षण आणि समाजसुधारणा यांतील बाळशास्त्रींच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे इंग्रज सरकारने त्यांना Justice of the Peace ही मानाची पदवी बहाल केली होती.

मराठी वृत्तपत्रांचे जनक

बाळशास्त्री जांभेकरांना मराठी वृत्तपत्रांचे जनक म्हणूनही ओळखले जाते. 6 जानेवारी 1932 ला जांभेकरांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या माध्यमातून बाळशास्त्रींनी समाज प्रबोधनाची चळवळ उभारली. यातील लेखांतून त्यांनी शिक्षणाचा जोरदार प्रचार केला. तसेच दर्पणच्या माध्यमातून बाळशास्त्रींनी तत्कालीन समाजाला आरसा दाखवून हा समाज सुधारण्याचे मोठे कार्य केले.

17 मे 1846 रोजी बाळशास्त्रींचे निधन झाले. अवघ्या 34 वर्षांच्या आपल्या आयुष्यात बाळशास्त्री जांभेकर यांनी भारताच्या समाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल असे कार्य केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here