बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकाला पत्नी आणि मुलाने मारहाण करून राहत्या इमारतीच्या ७व्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी अंधेरी पश्चिम येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी पत्नी आणि मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. ही हत्या आर्थिक वादातून झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले असले तरी या मागे वेगळे काही कारण होते का याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
असा घडला प्रकार
संतन शेषाद्री (५५) असे एका राष्ट्रीय बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकाचे नाव आहे. संतन हे एका राष्ट्रीय बँकेत सहाय्यक व्यवस्थापक या पदावर होते. अंधेरी पश्चिम वीरा देसाई मार्ग या ठिकाणी बँक कॉटर असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर पत्नी जयशीला आणि मुलगा अरविंद (२६) सोबत राहण्यास होते. शुक्रवारी सकाळी संतन शेषाद्री यांचा मृतदेह इमारतीच्या खाली रक्ताच्या थारोळ्यात आंबोली पोलिसाना मिळून आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पतीने स्वतःच्या हातची नस कापून घराच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पत्नी जयशीला आणि मुलगा अरविंद यांनी पोलिसांना दिली.
पत्नीने दिली कबूली
पोलिसांनी प्रथम मृतदेह ताब्यात घेऊन पूर्व तपासणीसाठी कूपर रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आला. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असावी या संशयातून पोलिसांनी संतन शेषाद्री यांच्या घराची झडती घेऊन पत्नी आणि मुलगा अरविंद या दोघांकडे चौकशी सुरू केली. घरात मिळून आलेल्या रक्ताच्या डाग याबाबत या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी नस कापल्यामुळे घरात रक्त पडले असल्याचा बनाव दोघांनी केला. मात्र पोलिसांनी दोघांना उलटसुलट प्रश्न विचारायला सुरुवात केली असता दोघे ही घाबरले आणि आम्हीच त्यांना मारहाण करून गॅलरीतून खाली फेकल्याची कबुली पत्नी जयशीला हिने दिली.
(हेही वाचा – महापालिकेतील उपायुक्तांमधून दोन अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक करा! )
कंटाळून मारण्याचा रचला कट
मुलाला शिक्षणासाठी परदेशात जायचे होते यासाठी त्याने पतीकडे तगादा लावून ही त्यांनी पैसे देण्यास नकार दिला, तसेच घरी देखील खर्चासाठी पैसे देत नव्हते व सतत भांडण करीत असल्यामुळे अखेर आम्ही दोघे त्यांच्या अशा वागण्याला कंटाळून त्यांना मारण्याचा कट रचला शुक्रवारी पहाटे पती भर झोपेत असतांना मुलाने त्यांच्या डोक्यात बॅटने प्रहार केला, त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन रक्त उडाले, पती निपचित पडताच आम्ही घाबरलो आणि दोघांनी मिळून त्यांना गॅलरीत आणले व खाली फेकले अशी कबुली पत्नी जयशीलाने पोलिसांना दिली. आंबोली पोलिसानी हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community