जवळपास १०० वर्ष जुन्या असणा-या बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामुळे बीडीडीवासियांची स्वप्नपूर्ती लवकरच होणार आहे. येथील रहिवाशांना सर्व सुविधांयुक्त मोठे घर देण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून बीडीडीवासियांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारले जाणार आहे. नायगाव येथील बीडीडी चाळ क्रमांक ५ ब च्या पाडकामाला सुरुवात झाली आहे. ही चाळ पाडल्यानंतर त्या रिक्त जागी लवकरच विक्रीयोग्य घरं बांधण्यात येणार आहेत. या बीडीडी चाळीचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने करण्यात येईल असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.
हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण होणार
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्लॉट ‘ब’मधील २३ चाळींचा पुनर्विकास करण्यात येत असून उर्वरित प्लॉट ‘अ’मधील १९ चाळींचा पुनर्विकास दुसऱ्या टप्प्यामध्ये केला जाणार आहे. प्लॉट ‘ब’मधील २३ चाळींपैकी चाळ क्रमांक ५ बी, ८ बी व २२ बी मधील १७५ गाळे महापालिकेच्या के. ई. एम. रुग्णालयास सेवानिवासंस्थान म्हणून देण्यात आले होते. या सेवा निवासस्थान गाळ्यांमधील रहिवाशांना नायगाव येथील बॉम्बे डाईंग या संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित करून चाळ रिक्त करण्यात आली आहे. निष्कासित रिक्त इमारती पाडून त्या ठिकाणी विक्रीयोग्य सदनिका बांधण्याचे प्रस्तावित असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. काही स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे प्लॉट ‘ब’मधील सर्वेक्षण पूर्ण होऊ शकले नाही. या रहिवाशांच्या मागण्यांबाबत योग्य तो विचार शासनातर्फे केला जाईल. रहिवाशांचे प्रकल्पाच्या बाजूने सकारात्मक मतपरिवर्तन झाले असून हा प्रकल्प मार्गी लागण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत, असे आव्हाड यांनी सांगितले.
( हेही वाचा: आयुक्त असे वागतात तरीही…)
पुनर्वसन इमारती बांधण्यात येणार
प्लॉट ‘अ’ मधील चाळ क्रमांक १ अ, २ अ, १४ अ, १८ अ, १९ अ या पाच चाळींतील रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले असून ३२५ पात्र लाभार्थ्यांची अंतिम पात्रता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नायगाव बीडीडी चाळीमध्ये तळ अधिक तीन मजल्यांच्या ४२ चाळी अस्तित्वात असून त्यामध्ये एकूण ३ हजार ३४४ रहिवासी वास्तव्यास आहेत. या पुनर्विकास प्रकल्पामध्ये तीन बेसमेंट व २२ मजल्यांच्या पुनर्वसन इमारती बांधण्यात येणार आहेत.
Join Our WhatsApp Community