नथुरामांनी केलेल्या गांधी हत्येमुळे सावरकर नावाच्या सूर्याला डाग पडला- शरद पोंक्षे

नथुराम गोडेसेंनी केलेल्या गांधी हत्येच्या कटात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव गोवण्यात आलं. सावरकरांचा या हत्येशी किंवा हत्येच्या कटाशी कुठलाही संबंध नसताना या प्रकरणात सावरकरांची नाहक बदनामी करण्यात आल्याचे विधान अभिनेते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांनी हिंदुस्थान पोस्टला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले आहे.

सावरकर आणि हिंदुत्वाची बदनामी

नथुराम गोडसे यांनी केलेल्या गांधी हत्येमागची कारणे काहीही असली तरी त्यामुळे सावरकरांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. या घटनेमुळे सावरकर नावाच्या सूर्यावर डाग पडला. त्यामुळे हिंदुत्वंही कायमस्वरुपी बदनाम झालं. ही एक मोठी जखम आहे. अनेक कायदेतज्ज्ञ आणि न्यायपंडितांनी वारंवार पटवून देऊन सुद्धा सावरकरांचं नाव या प्रकरणात गोवण्यात आलं.

(हेही वाचाः सावरकरांच्या विचारांमुळे हिंदू राष्ट्र निर्माण होण्याची काँग्रेसला भीती- शरद पोंक्षे)

सावरकरांनी कधीच हत्येचं समर्थन केलं नाही

सावरकर कधीही कोणत्याही हत्येचं समर्थन करूच शकत नाहीत. गोपाळ कृष्ण गोखले यांची हत्या करण्याचा कट करणा-यांना देखील सावरकरांनी रोखलं होतं. सावरकर हे दूरदृष्टी असलेले नेते होते. गांधी हत्येचे परिणाम काय होतील याचा अंदाज सावरकरांना नक्कीच आला असता, त्यामुळे सावरकरांना गांधी हत्येला विरोधच केला असता, असे स्पष्ट मत शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.

झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करणं कठीण

सावरकर निर्दोष आहेत हे सांगून सुद्धा त्यांच्यावर आरोप करण्यात येतो. कारण झोपेचं सोंग घेतलेल्या लोकांना जागं करणं कठीण आहे. त्यामुळे ते कायम हे आरोप करतच राहणार, आपण मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांमधलं सत्य लोकांपर्यंत कायम पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा, असेही पोंक्षे यावेळी म्हणाले.

(हेही वाचाः गांधी मेमोरियललाही मानावं लागलं सावरकरांचेच विचार गांधींपेक्षा श्रेष्ठ)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here