प्रेयसीला न्याय मिळावा म्हणून त्याने घेतली ६ व्या मजल्यावरून उडी; मंत्रालयातील घटना

प्रेयसीला न्याय मिळवून देण्यासाठी त्याने चक्क मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेतल्याची घटना गुरुवारी दुपारी मंत्रालयात घडली. या घटनेत सदर इसमाच्या कपाळाला मार लागून तो किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बापू नारायण मोकाशे (४३)असे या इसमाचे नाव आहे. बापू बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात राहणारा आहे. २०१८ मध्ये बापू याच्या प्रेयसीने गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाची योग्यरीत्या चौकशी झाली नाही. स्थानिक पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे प्रेयसीला न्याय मिळवून देण्यासाठी बापू मोकासे हा मुंबईत मंत्रालयात गुरुवारी आला होता. इकडेही त्याला कोणी दाद देत नसल्यामुळे अखेर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याने सहाव्या मजल्यावरून खाली उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
परंतु मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर सुरक्षित जाळी बसवण्यात आल्यामुळे बापू हा तिसऱ्या मजल्यावरील जाळीवर पडला. यामध्ये त्याच्या कपाळाला किरकोळ जखम झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जाळीवर पडलेल्या बापू मोकाशी यांना जाळीतून बाहेर काढून त्याला उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यानंतर बापू मोकाशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार  असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here