कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात घरगुती गणेश विसर्जन सोमवारी करण्यात आले आहे. सर्वत्र राज्यात आज सात दिवसांच्या बाप्पांना पाहुणचार दिल्यानंतर निरोप देण्यात येणार आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील एका तालुक्यात गणपती विसर्जनादरम्यान एक दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे येथे गौरी-गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केला. यावेळी तब्बल ४२ जण जखमी झाले आहे.
(हेही वाचा – गौरी-गणपतीच्या ४३ हजार मूर्तींचे रात्री १२ पर्यंत विसर्जन)
ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली असून यामध्ये जखमी झालेल्यांना बांबवडे आरोग्यवर्धिनी केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या ४२ जणांपैकी ३८ जणांना आता घरी सोडण्यात आले आहे.
अशी माहिती मिळत आहे की, सुपात्रे गावात असलेल्या तलाव परिसरात गणेश विसर्जन सुरू होते. यावेळी काल संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास विसर्जनाच्यावेळी गणेश भक्तांनी फटाक्याची माळ लावली. यावेळी या फटाक्यांमधून एक फटाका मधमाशांच्या पोळ्यात उडाला आणि बिथरलेल्या मधमाश्यांनी तेथील नागरिकांवर हल्ला केला. यामध्ये तब्बल ४२ जणं जखमी झाले आहे.
Join Our WhatsApp Community