दसरा मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे खास मित्र आणि एकनिष्ठ मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येणार अशी चर्चा रंगली होती. याआधी ठाकरेंचे जवळचे अनेक लोक शिंदे गटात गेले आहेत. या जवळच्या मित्रांपैकी संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर हे अगदी खास आहेत. त्यातले संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसाठी गेम चेंजर मानले जातात. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊतांनी विशेष पुढाकार घेतला होता आणि नंतर अडीच वर्षे ते चाणक्य असल्यासारखे वावरत होते.
(हेही वाचा – शिवसेना भवनजवळ जलवाहिनी फुटली, दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर)
संजय राऊत जणू महाराष्ट्राचे सर्वेसर्वा झाले होते. त्यांचा शब्द शिवसेनेत अखेरचा शब्द मानला जाऊ लागला. पण संजय राऊत यांची ग्राऊड लेव्हलची कारकीर्द तशी शून्य आहे. कारण ते कधीही जनतेतून निवडून आले नाहीत. मिलिंद नार्वेकरांची अवस्था देखील तशीच आहे. तेही कधी जनतेतून निवडून आले नाहीत किंवा थेट राजकारणात सहभागी झाले नाहीत. परंतु या दोघांमुळे अनेक लोक शिवसेना सोडून गेले.
मिलिंद नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार?
शिंदे यांनी उठाव केल्यानंतर हळूहळू शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करत आहेत. दसरा मेळाव्यामध्येही गर्दी जमवण्यात शिंदे यशस्वी झाले. आता प्रश्न असा आहे की मिलिंद नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार का? ही चर्चा दसरा मेळाव्या आधी रंगली होती परंतु दसरा मेळाव्याची पाहणी करायला खुद्द नार्वेकर गेल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला. तरी मला अजूनही याबाबतीत शंका आहे. मेळाव्यात गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. परंतु किर्तीकर ठाकरे गटाच्या मंचावर दिसले. पण त्यांना कधी ना कधी शिंदे गटात यावं लागेल.
ठाकरे गटाची मग्रूरी केवळ महानगपालिकेच्या निवडणूकीपर्यंत टिकणार आहे. ही निवडणूक दणक्यात हरल्यावर अनेक लोक शिंदे गट किंवा इतर पक्षाचा रस्ता पकडतील. कारण पराभूत नेत्याच्या मागे कुणीही जात नाही. राहुल गांधींच्या मागे जे काही लोक दिसत आहेत, ते कॉंग्रेसने स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतल्या होता, त्या पुण्याईमुळे. ठाकरेंचं तसं नाही. मग मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येतील का? शिंदे त्यांना आपल्या गटात घेऊन काय करणार? त्यापेक्षा नार्वेकर आधुनिक विभिषण होऊ शकतात. ठाकरे गटात राहून शिंदे गटाचं काम करु शकतात. त्याबदल्यात त्यांना कदाचित अभय दिला जाईल.
Join Our WhatsApp Community