जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीचा बहुमान एलाॅन मस्क यांनी गमावला आहे. टेस्लाचे संस्थापक एलाॅन मस्क यांनी एप्रिलमध्ये ट्वीटरसाठी बोली लावल्यानंतर टेस्लाचे बाजार मूल्य जवळपास अर्ध्याने कमी झाले आहे. तेव्हापासून मस्क यांची संपत्तीही सुमारे 70 अब्ज डाॅलरने कमी झाली आहे. मस्क यांना मागे टाकून फॅशन समूह लुई वुईटनचे प्रमुख बर्नार्ड अरनाॅल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
( हेही वाचा: मुंबईतील बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात भूमाफियाची घुसखोरी )
बर्नार्ड अर्नाल्ट यांची संपत्ती 186.5 अब्ज डाॅलर्स एवढी झाली, तर मस्क यांच्या संपत्तीत तब्बल 7.4 अब्ज डाॅलर्सची घट झाली असून, ती एकूण 181.3 अब्ज डाॅलर्सवर आली आहे. त्यामुळे मस्क यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकूट अरनाॅल्ट यांनी हिरावून घेतला आहे. इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाचे समभाग 13 एप्रिल रोजी 340.79 डाॅलरवर होते. त्याच्या एकच दिवस आधी ट्वीटरने नियामकीय दस्ताऐवज खुलासा केला होता की, मस्क हे ट्विटर कंपनी 43.4 अब्ज डाॅलरमध्ये खरेदी करत आहेत. तेव्हापासून टेस्लाचे समभाग 50 टक्क्यांनी घसरुन 167.82 डाॅलरवर आले आहेत.
अरनाॅल्ट आणि मस्क यांच्यातील दरी वाढली
- दोनच दिवसांपूर्वी एलाॅन मस्क यांनी फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर्सच्या यादीत जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीचा किताब थोड्या वेळासाठी गमावला होता.
- फॅशन समूह लुई वुईटनचे प्रमुख बर्नार्ड अरनाॅल्ट यांनी मस्क यांची जागा घेतली होती. टेस्लाचे समभाग ढासळल्याने मस्क दुस-या क्रमांकावर फेकले गेले होते.
- यावेळी दोघांमधील दरी तब्बल 6 अब्ज डाॅलर एवढी झाली आहे. टेस्लाचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे दरी आणखी वाढणार आहे.