बेस्टमधून येत्या वर्षात २०४४ कर्मचारी सेवानिवृत्त होणार; कायमस्वरूपी भरतीची मागणी

बेस्ट उपक्रमात सध्या ३ हजार ६०० गाड्या आहेत तसेच दैनंदिन प्रवाशांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बसगाड्यांची संख्या ६ हजारांवर नेण्याचे बेस्ट उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. परंतु बेस्टमध्ये गेल्या ८ वर्षांपासून नियमित भरती करण्यात आलेली नाही त्यामुळे बेस्टचे अस्तित्व टिकवण्यासाठी उपक्रमात कायमस्वरूपी भरती व्हावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

( हेही वाचा : रेल्वे अपघातात वर्षभरात 2 हजारहून अधिक मृत्यू; रेल्वेने जाहीर केली आकडेवारी )

…तर बेस्टमध्ये एकही कायमस्वरूपी कर्मचारी दिसणार नाही

२०२३ मध्ये बेस्टचे एकूण २ हजार४४ कर्मचारी, अधिकारी उपक्रमातून सेवानिवृत्त होत आहेत. बेस्टमध्ये जवळपास ४५ हजार कर्मचारी होते मागील ८ वर्षांपासून निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढली असून आता सध्या जवळपास ३१ हजार कर्मचारी वर्ग बेस्टकडे शिल्लक राहिला आहे. दरवर्षी बेस्टमधून सरासरी २ हजार कर्मचारी निवृत्त होत असल्याने कंत्राटी पद्धतीवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

बेस्टमध्ये आगामी काळात एकही कायमस्वरूपी कर्मचारी दिसणार नाही अशी चिंता कामगार संघटनेच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. २०२३ मध्ये बेस्ट उपक्रमाच्या परिवहन व वीज विभागातील निवृत्त होणाऱ्या एकूण २०४४ कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, सुपरवायझर, असिस्टंट ऑडिट ऑफिसर, डेपो मॅनेजर, ट्रॅफ्रिक मॅनेजर, वीजतंत्री, वरिष्ठ वाहक, वरिष्ठ चालक इत्यादी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here