‘बेस्ट’च्या ताफ्यात दाखल होणार पहिली इलेक्ट्रिक AC डबल डेकर बस!

डबल डेकर बस ही मुंबई शहराची खरी ओळख आहे. मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर सध्या आपल्याला डबल डेकर बसेस धावताना दिसतात. परंतु इंधनाचे भाव गगनाला भिडले असताना पेट्रोल-डिझेलच्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. मुंबई-दिल्लीसारख्या शहरांमध्ये आता आपल्याला इलेक्ट्रिक वाहने दिसू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने अलिकडे बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस दाखल केल्या आहेत. मात्र आता लवकरच मुंबईकरांना इलेक्ट्रिक डबल डेकर बसमधून प्रवास करता येणार आहे तसेच या बस वातानुकूलित सेवा देतील. मुंबईतील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस ७ ऑगस्ट रोजी म्हणजेच ‘बेस्टच्या स्थापना दिनानिमित्त’ लॉंच करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’कडून विद्यार्थ्यांना सवलतीत ‘बसपास’! जाणून घ्या दर)

मुंबईत ई-डबल डेकर एसी बस

मुंबईकर दैनंदिन प्रवासासाठी बेस्टला प्राधान्य देतात. जवळपास ३१ लाखांहून अधिक प्रवासी दररोज बेस्टने प्रवास करतात आगामी काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अधिक बसेसची आवश्यकता आहे. डबल डेकर बस एकावेळी १०० हून अधिक प्रवाशांना सेवा देते त्यामुळे आगामी काळात मुंबईत ई-डबल डेकर एसी बस पहायला मिळणार आहे.

चार्जिंग स्टेशन उभारणार

९०० इलेक्ट्रिक बसेसला मंजूर मिळाल्यामुळे २२५ ट्विन डेक बसचा पहिला ताफा वर्षाअखेरीस दाखल होणार आहे. बेस्टने ९०० एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस १२ वर्षांसाठी वेट लीजवर करण्याच्या कराराला मंजुरी दिली होती यातील पहिला ताफा ऑगस्ट महिन्यात दाखल होईल असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच महानगरात इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी जवळपास ५५ ठिकाणे निवडण्यात आली आहेत. पुढील ३ ते ४ महिन्यांत आणखी चार्जिंग स्टेशन उभारले जातील. त्यामुळे सर्वसामान्यांना त्यांच्या फायदा होईल असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा : मुंबईतील ‘बेस्ट’ Bus Stop सुशोभित होणार!)

सीएसएमटी ते बॅकबे आगार हा डबल डेकर बसचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. यावर्षी २२५ डबल डेकर बसेस मुंबईत दाखल होतील. तर दुसरा एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा ताफा मार्च २०२३ पर्यंत मुंबईत दाखल होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here