मुंबईत प्रवास करण्यासाठी बेस्ट वाहतुकीला मुंबईकर पसंती देत असतात. नुकताच बेस्ट प्रशासनाने एक अजबच फतवा काढला आहे. यानुसार तिकीटचे मशीन जर बिघडले तर आता कंडक्टरच्या पगारातून पैसे कापले जाणार असल्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे आता कर्मचारी संतापले असून ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. या विरोधात आज बेस्ट कर्मचारी संतप्त होऊन निदर्शने करणार आहेत.
(हेही वाचा – शिंदे-ठाकरे गटाची नावं तर ठरली, शिंदे गटाला कोणतं चिन्ह मिळणार?)
मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट प्रशासनाने तिकीट काढण्यासाठीच्या ईटीआय मशीनची देखभाल करण्याबद्दल एक परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये कंडक्टर आणि इतर ग्राऊंड स्टाफला मशीनची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या तिकीट मशीनच्या सुट्ट्या भागांचे दरही या पत्रकात दिले आहेत. यामध्ये १५ पार्ट्स आहेत. त्यापैकी सर्वात महाग पार्ट म्हणजे मेन बोर्डचा खर्च ८ हजार ४३८ रूपये दाखवण्यात आला आहे.
यापैकी कोणत्याही पार्टमध्ये बिघाड झाल्यास त्याचा खर्च कंडक्टरच्या पगारातून कापून घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे बेस्ट कर्मचारी संतप्त झाले आहेत. ते आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. आज, सोमवारी वडाळा आगारात हे कर्मचारी बेस्ट प्रशासनाविरोधात निदर्शने करणार असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community