गेली दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे प्रवासावर निर्बंध होते यामुळे बेस्ट उपक्रमाच्या प्रवासीसंख्येत घट झाली होती. मात्र आता सर्व निर्बंध शिथिल झाल्यामुळे बेस्टची प्रतिदिन प्रवासीसंख्या आता ३२ लाखांवर गेली आहे. परंतु आता बेस्टची प्रवासीसंख्या पूर्ववत झाल्याची माहिती बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच महिला विशेष बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना मान्सून गिफ्ट! लवकरच होणार महागाई भत्त्याची घोषणा)
प्रवासीसंख्या ३२ लाखांवर
बसताफ्यातील कमी झालेली बसची संख्या, वातानुकूलित बस सेवेचा अभाव यामुळे मुंबईकरांनी बेस्टऐवजी रिक्षा, खासगी टॅक्सी सेवांना पसंती दिली. बेस्ट प्रवासी संख्या मध्यंतरी ३१ लाखांपर्यंत पोहोचली होती. मे महिन्यात ही संख्या जवळपास २७ लाखापर्यंत होती यात वाढ होणे बेस्टला अपेक्षित होते. आता प्रवासीसंख्या पूर्ववत होऊन बेस्टची प्रवासीसंख्या ३२ लाखांवर गेली आहे. तसेच यातून प्रतिदिन दोन कोटींहून अधिक महसूल बेस्ट उपक्रमाला प्राप्त झाला आहे.
महिला प्रवासी संख्येत वाढ
दरम्यान बेस्टच्या महिला विशेष बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या महिला संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने महिला विशेष बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. कोरोनापूर्व काळात महिला विशेष बसच्या ५४ फेऱ्यांमधून प्रतिदिन २ हजार ५०० महिला प्रवास करत होत्या. परंतु आता ३९३ फेऱ्यांमधून १८ हजार महिला प्रवास करत असल्याची माहिती उपक्रमाने दिली. प्रत्येक फेरीतून सरासरी किमान ४५ महिला प्रवासी प्रवास करत आहेत. तसेच येत्या सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने दुमजली वातानुकूलित बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. यापैकी काही बसगाड्या महिला विशेष गाड्या म्हणून धावतील असे बेस्टमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मिडी बसऐवजी यापुढे मोठ्या आकाराच्या बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. भाडेतत्वावरील ३ हजार वातानुकूलित मोठ्या आकाराच्या बस २०२३च्या अखेरपर्यंत टप्प्याटप्प्यात दाखल केल्या जाणार असल्याचे उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community