सीएसएमटी आणि नरिमन पॉईंट/कफ परेड या दरम्यान बेस्ट उपक्रमाने डिजिटल बसेस सुरू केल्या आहेत. या बसेसला प्रवाशांकडून सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच बेस्टने येत्या काही महिन्यात आणखी काही मार्गांवर २० डिजिटल बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व बसेसमध्ये पेपरलेस तिकीट सुविधा म्हणजेच टॅप इन-टॅप आउट सुविधा उपलब्ध असेल असे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : New Labour Code : १ जुलैपासून नवे कामगार कायदे! खासगी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक सुट्ट्यांमध्येही होणार मोठा बदल )
टॅप इन-टॅप आउट बस सध्या लोकप्रिय होत आहेत. या सर्व बसेस ८० टक्के भरलेल्या असतात. मोबाईल अॅप किंवा चलो स्मार्टकार्ड वापरून लोक या बसेसमधून प्रवास करत आहेत. या बसेसची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे, असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.
टॅप इन – टॅप आउट सेवा म्हणजे काय ?
टॅप इन म्हणजेच प्रवासी बसमध्ये चढताना टॅप इन करणार आणि बसमधून उतरताना टॅप आउट करतात. टॅप इन-टॅप आउट यामधील अंतरावरून प्रवाशांचे भाडे स्मार्टकार्ड वॉलेटमधून कापले जाते.
२०२७ पर्यंत बेस्टकडे १०० टक्के इलेक्ट्रिक बस असतील
ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी बेस्ट १२ महिन्यांसाठी २१०० इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करणार आहे. बेस्टने यासाठी ऑलेक्ट्रा ग्रीन टेकशी करार केला आहे. बेस्टने २०२३ पर्यंत ५० टक्के इलेक्ट्रिक बस ताफ्यात उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे तर २०२७ पर्यंत बेस्टमधील सर्व बसेस १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे बेस्टचे उद्दिष्ट आहे. या सर्व बसेस एका चार्जवर २०० किमीपर्यंत धावू शकतात.
Join Our WhatsApp Community