७ ऑगस्ट, २०२२ रोजी ‘बेस्ट’ला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस ‘अमृतमहोत्सवी बेस्ट दिन’ म्हणून साजरा होणार आहे. या निमित्ताने बेस्ट प्रशासनाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या प्रस्तावास महाव्यवस्थापकांनी मंजुरी दिली आहे.
( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र!)
‘अमृतमहोत्सवी बेस्ट दिन’
‘अमृतमहोत्सवी बेस्ट दिन’ या कार्यक्रमाच्या संयोजनाकरिता व सादरीकरणाकरिता आवश्यक असणा-या कलाकारांची यादी बेस्टमार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. चित्रकला व रांगोळी प्रदर्शन, विदयार्थ्यांकरता चित्रकला स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा तसेच मुख्य मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये बेस्टने काही कर्मचारी वर्गाला सहभागी करून घेतले आहे. तसेच बेस्टच्या सर्व विभागप्रमुखांना या कार्यक्रमात सहभागी कर्मचाऱ्यांना तालीम / संयोजनाकरिता उपस्थित राहण्याबाबत सूचना द्याव्यात व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे. असे बेस्टने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
‘बेस्ट वार्ता’
७ ऑगस्ट रोजी बेस्टला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्ताने बेस्ट उपक्रमाने ‘बेस्ट वार्ता’ या आपल्या मुखपत्राचा बेस्ट दिन विशेषांक प्रसिध्द करण्याचे ठरवले आहे. यामध्ये मुंबईकरांना आपल्या ‘बेस्ट’ बरोबरच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळणार आहे. यासाठी मुंबईकरांनी त्यांच्या आठवणी लिहून पाठवण्याची विनंती केली आहे. या मुखपत्रात सर्व माजी बेस्ट समिती अध्यक्ष, सर्व माजी महाव्यवस्थापक, सर्व आजी माजी महापालिका आयुक्त यांचे अनुभव आणि आठवणी असणार आहेत. याखेरीज प्रथितयश कलाकार, खेळाडू आणि प्रसिद्ध किंवा मोठ्या व्यक्तींचे अनुभवही मुंबईकरांना वाचायला मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या नागरिकांना ‘बेस्ट’बरोबरच्या आठवणी लिहिण्याची संधीदेखील बेस्टने उपलब्ध केली आहे.
Join Our WhatsApp Community