मुंबईची सार्वजनिक वाहतूक सेवा असणाऱ्या बेस्टच्या कंत्राटी मिनी बसेस चालकांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. कंत्राटदार कंपनी वेळेत पगार देत नाही. प्रोव्हिडंट फंडाचे पैसे भरत नाही, अशा तक्रारी करत बेस्टच्या कंत्राटी मिनी बसेस कामगारांनी पुन्हा कामबंद आंदोलन केले आहे. कंत्राटदार कंपनी वेळेत पगार देत नसल्याने चालक आक्रमक होत त्यांनी काम करण्यास नकार दिला आहे.
… म्हणून कर्मचारी पुन्हा उतरले रस्त्यावर
एमपी ग्रृप नामक खासगी कंपनीने बेस्टच्या मिनी बसेस पाच डेपोमध्ये चालवण्याचे काम घेतले. त्यामध्ये विक्रोळी, कुर्ला, वांद्रे या डेपोमधील चालकांचं कामबंद आंदोलन सुरू झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसांत तिसऱ्यांदा बेस्टचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले असून त्यांनी काम करण्यात नकार दिला आहे. यापूर्वी देखील पगार वेळेत न दिल्याने आणि प्रोव्हिडंट फंडाचे पैसे भरत नसल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला होता. यावेळी बेस्टने नियमावली कारवाई करू असे आश्वासन दिले होते. मात्र यानंतरही कंत्राटी कंपनीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे बेस्ट बस चालकांचा आज मंगळवारी पुन्हा एल्गार पाहायला मिळाला. याचा परिणाम कुर्ला, विक्रोळी आणि वांद्रे डेपोतही झाला.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली मागणी
मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टने आपल्या बसेस प्रवाशांसाठी सेवेत काढल्या. नेहमीचे जे बेस्ट कर्मचारी होते त्यांना जादा बसेस सोडून कामावर पाठवले. मात्र असे असले तरी वारंवार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यावर बेस्ट प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जावीत, असे कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
(हेही वाचा – सावधान! बेस्ट वीजग्राहकांनो तुमची होऊ शकते फसवणूक )
Join Our WhatsApp Community