बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करत तोडगा काढणे आवश्यक!

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १७ जुलैपासून आंदोलन पुकारले आहे, गेल्या तीन महिन्यांपासून हे कर्मचारी वेतनापासून वंचित असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वडाळा आगारात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वडाळा आगारातून एम.पी. ग्रुपच्या नियोजित ६३ बसगाड्या बसचालक कामावर न आल्यामुळे चालू शकल्या नाही यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी २७ बसगाड्या चालवल्या आहेत तसेच या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा अशी सूचना बेस्ट उपक्रमाने कंत्राटदाराला केली आहे.

अन्यथा हे कामबंद आंदोलन सुरू राहणार

वेळेवर वेतन मिळावे आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात जमा व्हावी या मागणीसाठी कंत्राटी चालकांनी गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार कामबंद आंदोलन केले आहे. या कर्मचाऱ्यांना मे, जून व जुलै असा तीन महिन्यांचा पगार आणि पीएफचे पैसे असे वैयक्तिक जवळपास १ लाख रुपये मिळालेले नाहीत. कंत्राटदाराने जुलै महिन्याच्या १४ तारखेपर्यंत थकीत पगार दिला जाईल असे आश्वासित केले होते परंतु १७ तारखेपर्यंत पगार जमा न झाल्याने कंत्राटी कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर आहे. तसेच यावेळी केवळ पगार नको ८ महिन्याचा थकीत भविष्य निर्वाह निधी सुद्धा द्यावा अशी कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी असून सर्व कर्मचाऱ्यांचा पगार झाला तर रूजू होऊ अन्यथा हे कामबंद आंदोलन सुरू राहिल अशी ठाम भूमिका या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

तोडगा काढणे महत्त्वाचे…

बेस्टचे जनरल मॅनेजर व ट्रॅफिक मॅनेजर यांची यावर बैठक सुरू असून यावर काय तोडगा काढता येईल याबाबत चर्चा सुरू असल्याचे ज्येष्ट बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी सांगितले. बेस्टचे सर्व कंत्राटदार, विभागप्रमुख, कामगार प्रतिनिधी यांनी सर्वांनी मिळून याबाबत चर्चा करणे गरजेचे आहे. मुंबईचे येत्या काळात जे पालकमंत्री होतील त्यांची भेट घेऊन बेस्ट ही मुंबईची लाईफलाईन असून वारंवार बससेवा अशी विस्कळीत झाल्यास याचा सामान्यांना फटका बसतो त्यामुळे यावर बैठक घेऊन, अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर बेस्टने काय अ‍ॅक्शन घ्यावी याबाबत मार्ग काढू असे गणाचार्यांनी सांगितले. दरम्यान सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शिष्टमंडळाची बैठक सुरू असल्याची माहिती आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here