‘बेस्ट’ प्रवाशांना दिलासा; कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

128

गेल्या काही महिन्यांमध्ये बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी वेतन वेळेत मिळत नसल्याने कामबंद आंदोलन केले होते. १७ जुलैपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी बुधवार २० जुलैला मागे घेतले. कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन आणि अन्य मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. कामगारांनी संप मागे घेतल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

( हेही वाचा : पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ४४८ पदांसाठी भरती)

कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर 

बेस्ट वडाळा आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन, भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा होत नसल्याच्या निषेधार्थ रविवारपासून आंदोलन सुरू केले होते. या प्रकरणी तोडगा निघत नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते. या कर्मचाऱ्यांना मे, जून व जुलै असा तीन महिन्यांचा पगार आणि पीएफचे पैसे असे वैयक्तिक जवळपास १ लाख रुपये मिळालेले नव्हते. कंत्राटदाराने जुलै महिन्याच्या १४ तारखेपर्यंत थकीत पगार दिला जाईल असे आश्वासित केले होते परंतु १७ तारखेपर्यंत पगार जमा न झाल्याने कंत्राटी कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर होता. याआधी सुद्धा एम.पी ग्रुप कंत्राटदाराने वेळेत वेतन दिले नव्हते म्हणून कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी बेस्टकडून या कंत्राटदाराला दंड आकारण्यात आला होता.

भविष्यात आंदोलने होऊ नयेत याकडे लक्ष द्यावे

बेस्ट प्रशासनाने कंत्राटी चालकांचे कामबंद आंदोलन होण्यामागील कारणे समजून घेऊन त्यानुसार कारवाई करणे अपेक्षित आहे. बेस्टचे सर्व कंत्राटदार, विभागप्रमुख, कामगार प्रतिनिधी यांनी सर्वांनी मिळून याबाबत चर्चा करणे गरजेचे आहे. असे सुनील गणाचार्य यांनी सांगितले तर, बेस्टच्या कंत्राटी चालकांचे आंदोलन सुरू असताना, बेस्ट प्रशासन नेमके काय करत होते हा प्रश्न मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. बेस्टने हे आंदोलन सुरू असतानाच त्यात हस्तक्षेप करणे गरजेचे होते. तसेच भविष्यात अशी आंदोलने होऊ नयेत याकडे बेस्ट प्रशासनाने लक्ष द्यावे असेही रवी राजा यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.