मुंबई बेस्ट परिवहन उपक्रमाने १ हजार ४०० इलेक्ट्रिक बसगाड्या खरेदी करण्यासाठी सुरू केलेल्या निविदा प्रक्रियेतून चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवले म्हणून टाटा मोटर्सने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आता बेस्टतर्फे मुंबई उच्च न्यायालयात दावा करण्यात आला आहे. मुंबई शहर व उपनगरांत बेस्ट परिवहनच्या डिझेलवरील बसगाड्या दररोज २०० किलोमीटर धावतात. तोच मुख्य निकष आम्ही इलेक्ट्रिक बसगाड्यांच्या खरेदीसाठीही लावला. त्या निकषाची पूर्तता टाटा मोटर्सकडून होत नसल्यानेच या कंपनीला आम्ही निविदाप्रक्रियेतून वगळले असे बेस्टने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले आहे. उच्च न्यायालयाने या वादासंदर्भातील आपला निर्णय राखून ठेवला आहे.
( हेही वाचा : Aadhaar Card Photo : आधार कार्डवरील फोटो तुम्हाला आवडत नाही? या सोप्या प्रक्रियेने सहज बदला तुमचा फोटो )
टाटा मोटर्सकडून निकषाची पूर्तता होत नव्हती म्हणून त्यांना वगळले
तर एव्हि ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट मिळावे या उद्देशानेच आमच्या किरकोळ त्रुटींचे कारण पुढे करत बेस्टने आम्हाला वगळले असा प्रतिदावा टाटा मोटर्सने केला आहे. अखेर सुनावणीअंती न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला व न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने या वादावरील आपला निर्णय राखून ठेवला आहे. टाटा मोटर्सतर्फे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी, बेस्टतर्फे ज्येष्ठ वकील व्यंकटेश धोंड तर एव्ही ट्रान्सतर्फे ज्येष्ठ वकील सोमशेखर सुंदरसेन यांनी युक्तिवाद मांडला, टाटा मोटर्सकडून निकषाची पूर्तता होत नव्हती म्हणून त्यांना वगळले, बेस्टच्या निर्णयात काहीच बेकायदा नाही असा युक्तिवाद धोंड यांनी मांडला.
काय आहे प्रकरण?
बेस्टने सार्वजनिक वाहतुकीसाठी १ हजार ४०० सिंगल डेकर वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्यांसाठी २६ फेब्रुवारी रोजी ई-निविदा सूचना प्रसिद्ध केली होती. टाटा मोटर्सने २५ एप्रिलला आपली तांत्रिक आणि आर्थिक बोली सादर केली होती असे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. परंतु बेस्टने तांत्रिक अनुकूलता मूल्यांकन जाहीर करत आमची निविदा वगळली. चुकीच्या पद्धतीने व चुकीचे निकष लावून हा निर्णय घेण्यात आला आहे असे दावा टाटा मोटर्सने याचिकेमार्फत केला आहे.
Join Our WhatsApp Community