पावसाळ्यासाठी ‘बेस्ट’ सज्ज!

176

पावसाळा सुरू होताच वीज खंडित होणे, विजेचा झटका लागणे अशा घटना घडत असतात. बेस्ट विद्युत विभाग पावसाळ्यापूर्वी वीज ग्राहकांना सावधानतेचा इशारा देत असते. यंदाही विद्युत विभाग सज्ज झाला असून घटना टाळण्यासाठी बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाने उपाययोजना केल्या आहेत. पावसाळ्यात विविध समस्यांचा सामना करण्यासाठी तसेच ग्राहक तक्रारींच्या निवारणार्थ बेस्ट उपक्रमाचा ‘वितळतार नियंत्रण कक्ष’ (फ्यूज कंट्रोल) २४ तास कार्यरत असणार आहे. ग्राहक त्यांच्या तक्रारी ‘MiBest’ या अॅपवर सुद्धा नोंदवू शकतात. हे अॅप वीज ग्राहक गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करु शकतात.

( हेह वाचा : मुंबई पोलिसांसाठी आयुक्तांनी घेतला ‘BEST’ निर्णय!)

पावसाळ्यामध्ये वीजेचा धक्का बसू नये अथवा इतर अपघात घडू नयेत यासाठी बेस्ट उपक्रमाने खाली दिल्याप्रमाणे ‘काय करावे’ व ‘काय करु नये’ यासंबंधित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

वीजग्राहकांनो हे करा…

१. पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्याकरता वीजमापक केबिन सिमेंटने बांधून घ्या, तसेच केबिन जमिनीपासून उंचावर बांधा जेणेकरुन त्यात पावसाचे पाणी शिरणार नाही.

२. अतिवृष्टीच्यावेळी किंवा वीजमापक केबिनमध्ये पाणी गळू लागल्यास आपल्या घरातील वीजेचे मुख्य स्वीच बंद करा. विद्युत संच मांडणीतील त्रुटी पूर्णपणे दूर झाल्यानंतर तसेच परवानाधारक विद्युत कंत्राटदाराने अथवा बेस्ट उपक्रमाच्या कर्मचा-यांने सुरक्षिततेची खात्री दिल्यानंतरच वीज पुरवठा सुरु करा.

३. वीजमापकांची केबिन, दिव्यांचे खांब, लाल रंगाचा वीज वितरण स्तंभ (डिस्ट्रिब्युशन पिलर्स) यामधून ठिणग्या पडत असतील किंवा त्याद्वारे वीजेचा धक्का लागत असेल तर संबंधित फ्युज नियंत्रण कक्षाशी तात्काळ संपर्क साधा.

वीजग्राहकांनो हे करू नका…

१. वीजमापकांच्या केबिनमध्ये पाणी गळत असल्यास हातमोजे, रबरी बूट, लाकडी अथवा इन्सुलेटेड प्लॅटफार्मचा वापर केल्याशिवाय संच मांडणीस ओलसर अथवा सुरक्षा उपकरणे / रबरी हातमोजे घातल्याशिवाय स्पर्श करु नका.

२. कोणत्याही परिस्थितीत विजेची ठिणगी पडत असेल तसेच पाणी गळत असेल तर वीज डिस्ट्रिब्युशन पिलर्स व केबिनमधील वीजमापकांना स्पर्श करु नका.

पावसाळयात वीजग्राहकांना सर्वतोपरी मदत मिळावी या करता बेस्ट उपक्रमाने आवश्यक ती तयारी केली आहे. वीजग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी बेस्टतर्फे सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत, प्रसंगी खबरदारीचे उपाय म्हणून बेस्टला वीज पुरवठा बंद करावा लागतो. वीज ग्राहकांनी अशा आणीबाणीच्या काळात कर्मचारी वर्गाला सहकार्य करावे, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.