‘एसटी’नंतर ‘बेस्ट’च्या विलिनीकरणाची मागणी; ‘बेस्ट’ची चाकंही थांबणार?

राज्य शासनात विलिनीकरण करा या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत आंदोलन सुरू आहे. या एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपावर कोणताही तोडगा निघत नाही, तर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी देखील आता विलिनीकरणाची मागणी उचलून धरली आहे. बेस्टचे महापालिकेत विलिनीकरण करा, अशी मागणी बेस्टकडून करण्यात आली आहे. दरम्यान, बेस्ट कृती समितीतर्फे राज्य सरकारकडे ही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संप अद्याप मिटलेला नसताना राज्य सरकारपुढे बेस्टचे नवे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी बसनंतर बेस्टची चाकं थांबणार का? हा सवाल उपस्थितीत होत आहे.

(हेही वाचा- स्वातंत्र्यवीरांच्या शब्दांनी बदललं बाबासाहेबांचं आयुष्य)

बेस्ट कृती समितीचे सदस्य नितीन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट समिती आणि पालिका सभागृहाने हा ठराव एकमतानं मंजूर करुन राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्याला अजूनतरी राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही.

‘बेस्टचं महापालिकेत विलिनीकरण करा’

बेस्ट कृती समितीकडून राज्य सरकारकडे ही मागणी करण्यात आल्यानंतर यासंदर्भातील बेस्ट समिती, पालिका सभागृहाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. एकीकडे राज्यभरात सर्वच एसटी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर महामंडळाकडून कारवाईचा बडगा देखील उगारण्यात आला होता आणि हजारोंच्या संख्येने एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत एसटी वाहतूक बंद असल्याने एसटी प्रवाशांचे आतोनात हाल होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईसह काही भागात एसटी मार्गासाठी पर्यायी वाहतूक म्हणून बेस्ट बसला प्रशासनाकडून एसटी मार्गावर रस्त्यावर उतरवण्यात आले होते. मात्र आता बेस्टचं महापालिकेत विलिनीकरण करा, अशी मागणी असलेल्या ‘बेस्ट’बसची वाहतूक बंद होणार का…हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here