चलो अॅपच्या प्रसिध्दीसाठी सचिन तेंडुलकर आणि अनिल कपूर यांचा सहभाग असलेली चित्रफित बेस्ट उपक्रम प्रसिद्ध करणार आहे. परंतु हे कंपनीचे प्रमोशन असून यातून बेस्ट कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार असा सवाल बेस्ट कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ सोबत ‘पुढे चला’! काय आहे हे डिजीटल अभियान? )
बेस्ट कर्मचारी नाराज
मध्यंतरी चलो अॅपची जाहिरात करणाऱ्या एका वाहकाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. याआधी बेस्ट कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम केल्यास त्यांना प्रोत्साहन भत्ता (incentive)दिला जात होता. परंतु आता मात्र चलो अॅपसारख्या डिजीटल माध्यमांमुळे कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेले टार्गेट पूर्ण केल्यावरच तुटपुंजा अतिरिक्त बोनस मिळतो. त्यामुळे कर्मचारी वर्गाने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
चलो अॅपला बेस्ट उपक्रमाने प्रोत्साहन देऊन कर्मचारी वर्गावर अन्याय केल्याचे मत वरिष्ठ बेस्ट कर्मचाऱ्याने व्यक्त केले आहे. चलो अॅपचे अनावरण झाल्यापासून सर्व व्यवहार डिजीटल झाला. यामुळे बस वाहकाला केवळ तिकिट द्यायचे काम राहिले असून बेस्टच्या नफ्या-तोट्याचा लेखाजोखासुद्धा खासगी कंपनीकडे गेला आहे. तसेच कोरोना काळात अविरत सेवा देऊनही कर्मचाऱ्यांना आजवर थकीत कोविड भत्ता देण्यात आलेला नाही, यामुळेही कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. असे आपली बेस्ट आपल्यासाठी या समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
चलो अॅप बोनस
- बस वाहकांनी बेस्ट चलो बस पासची विक्री केल्यास प्रत्येक कार्ड मागे वाहकाला ५ रुपये बोनस मिळतो.
- एकाच दिवशी १० बस पासची विक्री केल्यास २० रुपये अतिरिक्त बोनस मिळतो.
- प्रत्येक महिन्याला पात्र बस वाहकांना प्रत्येकी ५०० रुपये अतिरिक्त बोनस दिला जातो. (कमीत कमी ५० कार्ड विक्री)
- त्रैमासिक बक्षिस म्हणून आगारातील १० पात्र बस वाहकांना प्रत्येकी १ हजार रुपये दिले जातात.