मुंबईत बेस्ट प्रवाशांच्या सेवेत जवळपास ३ हजार ५०० गाड्या धावत आहेत. कोरोना काळात सुद्धा बेस्ट कर्मचाऱ्यांनी मुंबईकरांना सेवा दिली. गेली काही वर्ष शासनाने विविध विभागातील कर्मचाऱ्यांना अल्पदरात बाजारमूल्य आकारून घरे देण्याचे धोरण निश्चित केले आहे, तसेच गिरणी कामगार, पोलीस कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना सुद्धा हक्काचे घर ज्या वसाहतीत हे कर्मचारी राहत आहेत त्या ठिकाणी द्यावे. हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊन हजारो कर्मचारी मुंबईबाहेर स्थलांतरित होऊ नये यासाठी सकारात्मक पाऊल प्रशासनाने उचलावे अशी मागणी बेस्ट वसाहतीतील कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
( हेही वाचा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; IBPS अंतर्गत बंपर भरती सुरू! असा करा अर्ज)
मालकी घरांसाठी मागणी
१५ जुलै १९२६ पासून बेस्ट बस मुंबईत सुरू झाली आणि १९४७ मध्ये मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आली. बेस्टमध्ये कालानुरूप असंख्य बदल झाले असून आता बेस्टच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक बसेस सुद्धा दाखल झाल्या आहेत. बेस्टमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची ही तिसरी पिढी आहे तसेच मुंबईच्या सर्व भागात, कानाकोपऱ्यात बेस्ट सेवा आहे त्यामुळे अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि वसाहतीमध्ये मालकी हक्काचे घर द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे बेस्टच्या नियमित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आला आहे. बेस्ट प्रशासनाने स्वतःचे सर्व कर्मचारी, बसेस ठेवल्या असत्या तर ही वेळच आली नसती अशाप्रकारची चर्चा सध्या नियमित सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. बेस्ट प्रशासनाने यातून मार्ग काढत खाजगीकरण बंद करून स्वतःच्या मालकीच्या बसेस आणि त्यावरील कर्मचाऱ्यांची नियमाने भर्ती करावी, बेस्ट उपक्रमाला आणि मुंबईकरांना नेहमी होणारा मनस्ताप कायमचा संपवून टाकावा अशी मागणी सध्या कर्मचारी व मुंबईकर प्रवाशांकडून केली जात आहे.
Join Our WhatsApp Community