कोरोना काळात सामान्य लोकांना रेल्वे प्रवासाची मुभा नव्हती यामुळे या काळात मुंबईकरांकडे बेस्टने प्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता. या काळात निरंतर सेवा दिलेले बेस्ट उपक्रमातील चालक, वाहकांसह विद्युत, अभियंता विभागांतील शेकडो कर्मचारी कोविड भत्त्यापासून वंचित राहिले आहेत. २३ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमधील कोविड भत्ता अद्यापही कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. यासंदर्भात एका बेस्ट कर्मचाऱ्याने बेस्ट उपक्रमाला पत्र लिहित कोविड भत्त्याची मागणी केली आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांची ‘या’ मागण्यांसाठी स्वाक्षरी मोहीम! )
कोविड भत्त्यापासून वंचित
कोविड काळात महापालिका कर्मचाऱ्यांसारखेच बेस्ट कर्मचाऱ्यांनीही काम केले. परंतु महापालिका कर्मचाऱ्यांना पूर्ण कोविड भत्ता देण्यात आला आहे. मग, बेस्ट कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय का असा सवाल कर्मचारी संघटनेचे नेते शशांक राव यांनी उपस्थित केला आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी कोविड काळात जीव तोडून काम केले आहे त्यामुळे आता बेस्ट कर्मचाऱ्यांना व्याजासकट कोविड भत्ता मिळणे अपेक्षित आहे असेही ते म्हणाले.
फेब्रुवारी २०२१ मध्ये यासंदर्भात पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत याविषयी बैठक झाली होती. तरीही, आम्हा कर्मचाऱ्यांना अद्याप कोविड भत्ता मिळालेला नाही असे बेस्ट कर्मचाऱ्याने स्पष्ट केले आहे. अत्यावश्यक सेवा देताना अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती तर अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. बेस्ट उपक्रमाने दररोज ३०० रुपये कोविड भत्ता देण्यास मंजुरी दिली होती. तशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. जूनपर्यंत हा भत्ता कर्मचाऱ्यांना मिळाला. त्यानंतर भत्ता देणे बंद झाले. वारंवार मागणी करुनही आजही कर्मचारी कोविड भत्त्यापासून वंचित आहेत. असेही ते म्हणाले.
( हेही वाचा : आता पर्यटनातही नाईट लाईफ! मध्यरात्रीपर्यंत ‘बेस्ट’ हेरिटेज टूर )
बेस्ट कर्मचारी संघटनांचे आंदोलन सुरू
दरम्यान, कोविड भत्त्याशिवाय इतर मागण्यांसाठीही कर्मचारी वर्गात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. बेस्ट मालकीच्या जागा खासगी कंत्राटदारांना देऊ नये, बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे, बेस्ट प्रशासनाने ३ हजार ३३७ स्वमालकीच्या बसगाड्यांचा ताफा कायम राखणे, या अनेक मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community