‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता मिळेना!

कोरोना काळात सामान्य लोकांना रेल्वे प्रवासाची मुभा नव्हती यामुळे या काळात मुंबईकरांकडे बेस्टने प्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता. या काळात निरंतर सेवा दिलेले बेस्ट उपक्रमातील चालक, वाहकांसह विद्युत, अभियंता विभागांतील शेकडो कर्मचारी कोविड भत्त्यापासून वंचित राहिले होते. सोमवारी कुलाबा येथे झालेल्या बेस्टच्या डिजिटल कार्डच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रलंबित कोविड भत्ता प्रदान करतील अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती, परंतु कर्मचाऱ्यांना केवळ ग्रॅज्यूएटी प्रदान करण्यात आली.

( हेही वाचा : 125 वर्षे जुन्या भायखळा रेल्वे स्थानकाला नवे रुप! या तारखेला होणार उद्घाटन )

बेस्ट कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय का?

२३ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमधील कोविड भत्ता अद्याप कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. कोविड काळात महापालिका कर्मचाऱ्यांसारखेच बेस्ट कर्मचाऱ्यांनीही काम केले. परंतु महापालिका कर्मचाऱ्यांना पूर्ण कोविड भत्ता देण्यात आला आहे. मग, बेस्ट कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय का असा सवाल कर्मचारी संघटनांनी उपस्थित केला आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी कोविड काळात जीव तोडून काम केले आहे त्यामुळे आता बेस्ट कर्मचाऱ्यांना व्याजासकट कोविड भत्ता मिळणे अपेक्षित आहे अशी कर्मचारी वर्गाची मागणी आहे.

कोविड भत्त्यापासून वंचित

बेस्ट उपक्रमाने दररोज ३०० रुपये कोविड भत्ता देण्यास मंजुरी दिली होती. तशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. जून २०२०पर्यंत हा भत्ता कर्मचाऱ्यांना मिळाला. त्यानंतर भत्ता देणे बंद झाले. वारंवार मागणी करुनही आजही कर्मचारी कोविड भत्त्यापासून वंचित आहेत. दरम्यान डिजिटल कार्डच्या लोकार्पण सोहळ्यात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्यूएटीच्या ४८३ कोटी रुपयांच्या निधीचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते डिजिटली वितरण करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here