कोरोना काळात सामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी नव्हती. या काळात समस्त मुंबईकरांना बेस्ट प्रशासनाने अविरत सेवा दिली. या काळात निरंतर सेवा दिलेले बेस्ट उपक्रमातील चालक, वाहकांसह विद्युत, अभियंता विभागांतील शेकडो कर्मचारी कोविड भत्त्यापासून वंचित राहिले आहेत. २३ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमधील कोविड भत्ता अद्यापही कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. यासंदर्भात एका बेस्ट कर्मचाऱ्याने २७ जानेवारी २०२२ रोजी बेस्ट उपक्रमाला पत्र लिहित कोविड भत्त्याची मागणी केली आहे.
( हेही वाचा : आता बसची पाहू नका वाट! ‘बेस्ट’चं लोकेशन तुमच्या हातात! )
( हेही वाचा : बेस्ट अॅप : मराठीचा आग्रह, ‘चलो’ नको ‘चला’च…! )
वारंवार मागणी करूनही कर्मचाऱ्यांना भत्ता नाही
यापूर्वी बेस्ट प्रशासनाने नोव्हेंबरमध्ये राहिलेला कोविड भत्ता मिळेल असे जाहीर केले होते. परंतु या आश्वासनाची पूर्तता करण्यास बेस्ट प्रशासन अयशस्वी ठरले आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये यासंदर्भात पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत याविषयी बैठक झाली होती. तरीही, आम्हा कर्मचाऱ्यांना अद्याप कोविड भत्ता मिळालेला नाही असे बेस्ट कर्मचाऱ्याने स्पष्ट केले आहे. अत्यावश्यक सेवा देताना अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती तर अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. बेस्ट उपक्रमाने दररोज ३०० रुपये कोविड भत्ता देण्यास मंजुरी दिली होती. तशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. जूनपर्यंत हा भत्ता कर्मचाऱ्यांना मिळाला. त्यानंतर भत्ता देणे बंद झाले. वारंवार मागणी करुनही आजही कर्मचारी कोविड भत्त्यापासून वंचित आहेत. असेही ते म्हणाले.
( हेही वाचा : तिकीट देता देता..कंडक्टरचा असाही मार्केटिंगचा फंडा… )
( हेही वाचा : बेस्टच्या या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास होणार ‘BEST’! )
कर्मचाऱ्याचं बेस्टला पत्र
मी उपरोक्त कोविड काळात नियमित कामकरुन सेवा दिलेली आहे. त्यामुळे आपण जाहीर केलेल्या विभागीय परिपत्रकानुसार मी ३०० रुपये प्रतिदिन कोविड भत्ता मिळण्यास पात्र आहे. परंतु मला हा भत्ता देण्यात आलेला नाही तरी मी आपणास विनंती करतो की, मी उपरोक्त काळात एकूण १३५ दिवस काम केले आहे. म्हणून, मला ४० हजार ५०० रुपये भत्ता देण्यात यावा. अशा आशयाचे पत्र एका बेस्ट कर्मचाऱ्याने २७ जानेवारी २०२२ रोजी बेस्ट उपक्रमाला लिहिले आहे.
Join Our WhatsApp Community