बेस्ट उपक्रम एकीकडे डबघाईला आलेला आहे तर दुसरीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांना अधिकार्यांचा जाच सहन करावा लागत आहे. बेस्टमध्ये नवीन कामगारांची भरती जवळ-जवळ बंदच झाल्याने काम वाढले आहे. यामुळे नियमापेक्षा अधिक वेळ कर्मचाऱ्यांना काम करावे लागत असल्याचा दावा कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. परिणामी कर्मचाऱ्यांवर मानसिक व शारीरिक ताण येत आहे. या आगारात नव्याने आलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आम्हाला हा त्रास होत असल्याचा आरोप कामगार करत आहेत. याबाबत भाजप बेस्ट कामगार संघटनेचे सल्लागार सुनील गणाचार्य यांच्याकडेही कर्मचाऱ्यांनी तक्रार केली आहे.
(हेही वाचा – बेस्ट मार्गात ‘असे’ होणार बदल! जाणून घ्या…)
कामगारांनी मांडली कैफियत
कर्मचारी तणावात असल्याने प्रवाशांच्या जीवालाही यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही बेस्ट कामगार व्यक्त करीत आहेत. कामगारांनी त्यांची ही कैफियत बेस्ट समितीचे माजी जेष्ठ सदस्य आणि भाजप बेस्ट कामगार संघटनेचे सल्लागार सुनील गणाचार्य यांच्याकडे मांडली आहे. याची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
बेस्ट आर्थिक खड्ड्यात जाण्याची कर्मचाऱ्यांना भिती
दिंडोशी आगारात दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांची आणि बसेसची संख्या कमी होत आहे. मात्र प्रवाशांची संख्या वाढत आहे. अशावेळी कामगारांचा जीव जाईपर्यंत मनमानी पद्धतीने काम करून घेतले जाणार का? असा सवाल या आगारातील कर्मचाऱ्यांकडून विचारण्यात येत आहे. कामगारांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेतले जात आहे. तसेच हे अधिकारी मनमानी पद्धतीने रिकाम्या बसेस एका पाठोपाठ पाठवून उपक्रमाचे आर्थिक नुकसान करीत आहेत. अशा प्रकारे दिंडोशी आगारातील नवीन अधिकारी कामगारांना मानसिक शारीरिक मनस्ताप देत असल्याची कैफियत कामगारांकडून मांडण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता अधिकारी आमचे म्हणणे मान्य करत नसल्याचे कर्मचारी सांगतात.
Join Our WhatsApp Community