‘बेस्ट’ उपक्रमाअंतर्गत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सेवेचा लोकापर्ण सोहळा कार्यक्रम २५ एप्रिल रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बेस्टचे महाव्यवस्थापक व सर्व मान्यवरांनी बेस्ट कामगारांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. मुंबईतील जनतेला विश्वसनीय कार्यक्षम आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी कामगार कटीबध्द आहेत. स्वस्त व मस्त सेवा देणारा हा ‘बेस्ट’ उपक्रम आहे. बेस्ट कामगारांचे या कार्यक्रमामध्ये भरभरुन कौतुक करण्यात आले. परंतु बेस्टमधील सद्यस्थितीने कामगारवर्ग त्रस्त झाला असून उपक्रमाने आमची दिशाभूल केली असा आरोप बेस्ट कर्मचाऱ्यांनी केला आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ कर्मचारी ६ मे रोजी करणार निदर्शने! )
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या थकीत मागण्या
- बेस्ट प्रशासनाने मंजूर केलेला ३१ डिसेंबर २०२० पर्यंतचा थकीत कोविड भत्ता कर्मचाऱ्यांना दिलेला नाही. कोविड भत्ता केव्हा देणार याची तारीख सुध्दा जाहीर केली नाही.
- १ एप्रिल २०१६ पासून वेतन वाढीची थकबाकी रक्कम देण्याची घोषणा सुध्दा लोकापर्ण सोहळ्यामध्ये केली नाही.
- बेस्ट कामगारांचा गोठवलेला रजा प्रवास भत्ता, रजेच्या रोखीकरण योजनेची रक्कम, शिष्यवृत्त्या रक्कम देण्याबाबत निर्णय नाही.
- बेस्ट उपक्रमाचा सी अर्थसंकल्प बृहन्मुंबईच्या ए अर्थसंकल्पामध्ये विलीन करण्याबाबत निर्णय नाही.
- रिक्त असलेली पदे भरण्याची घोषणा केली नाही. रद्द केलेली पदे भरण्याची घोषणा केली नाही.
- कंत्राटी पध्दतीने बस चालविण्यासाठी दिल्यामुळे कामगारांच्या मुलांना नोकरी मध्ये सामावून घेतले जाणार नाही. कोविड भत्ता, रजा प्रवास भत्ता, रजेचे रोखीकरण, शिष्यवृत्त्या रक्कम, थकबाकी देण्याची घोषणा नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सेवेच्या लोकापर्ण सोहळयात केली गेली नाही. म्हणूनच ‘बेस्ट’ कामगारांची उपक्रमाने दिशाभूल केली असा आरोप कर्मचारी वर्गाकडून केला जात आहे.